हार्दिक अऩ् विराटसह लॉकडाऊनमध्ये भारताच्या पाच खेळाडूंनी दिली आनंदाची बातमी!

कोरोना व्हायरसमुळे सहा-सात महिन्यांपासून भारतीय क्रिकेटपटूंना आपापल्या घरीच रहावे लागले होते. आता इंडियन प्रीमिअर लीगच्या निमित्तानं भारतीय खेळाडूंना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरता येणार आहे. पण, या कोरोनाच्या काळात भारताच्या पाच खेळाडूंनी आनंदाची बातमी देऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला.

लॉकडाऊनमध्ये सर्वात पहिली गोड बातमी दिली, ती हार्दिक पांड्यानं... 2020 वर्षाच्या स्वागताला त्यानं प्रेयसी नताशा स्टँकोव्हीचसह साखरपुडा केला, त्यानंतर लॉकडाऊनमध्ये घरच्या घरी नताशासोबत लग्नही केलं आणि बाप बनणार असल्याचे जाहीर केलं. त्यानंतर त्यानं 31 जुलैला मुलाचा फोटो पोस्ट करून गुड न्यूज दिली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या सुरेश रैनानंही 23 मार्चला गोड बातमी दिली. त्याच्या घरी चौथा सदस्य आला आणि रिओ असं त्याचं नाव ठेवण्यात आले.

लॉकडाऊनच्या काळात टिकटॉक व्हिडीओनं सर्वांचं मनोरंजन करणाऱ्या युजवेंद्र चहलनंही प्रेयसी धनश्री वर्मासोबत साखरपुडा उरकला. त्यानं सोशल मीडियावर धनश्रीसोबतचा फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिली.

काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर यानंही वैशाली विश्ववेश्वरनसह साखरपुडा केल्याचे फोटो पोस्ट केले.

गुरुवारी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनंही पत्नी अनुष्का प्रेग्नेंट असल्याची बातमी दिली. त्यानं अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करून जानेवारी 2021मध्ये कुटुंबात नव्या सदस्याचे स्वागत होईल, असे लिहिले.