Hardik & Krunal Pandya : वडिलांची हॅट, शूज अन् कपडे घेऊन हार्दिक-कृणाल पांड्या टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले, Photo Viral

भारत विरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st ODI) यांच्यातला पहिला वन डे सामना हार्दिक व कृणाल ( Hardik & Krunal Pandya) या पांड्या भावंडांसाठी खूप भावनिक ठरला. ज्या वडिलांनी दोन्ही मुलांना क्रिकेटपटू बनवण्यासाठी खस्ता खाल्ले तेच आज हयात नसताना कृणालनं टीम इंडियाच्या वन डे संघातून पदार्पण केलं. ( Hardik & Krunal Pandya bring the shoes, hat, clothes of their father to the dressing room )

भारत विरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st ODI) यांच्यातला पहिला वन डे सामना हार्दिक व कृणाल ( Hardik & Krunal Pandya) या पांड्या भावंडांसाठी खूप भावनिक ठरला. ज्या वडिलांनी दोन्ही मुलांना क्रिकेटपटू बनवण्यासाठी खस्ता खाल्ले तेच आज हयात नसताना कृणालनं टीम इंडियाच्या वन डे संघातून पदार्पण केलं.

हार्दिकच्या हस्ते कृणालला टीम इंडियाच्या पदार्पणाची कॅप देण्यात आली. हे चित्र पाहण्यासाठी आज त्यांचे वडील जीवंत नाहीत. जानेवारी २०२०मध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानं हिमांशू पांड्या यांचे निधन झाले. १६ जानेवारीला हिमांशू पांड्या यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झाले. त्यावेळी कृणाल सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वें-20 स्पर्धेत खेळत होता आणि ही बातमी समजताच त्यानं बायो-बबल कवच सोडून तो घरी परतला होता.

मंगळवारी हार्दिकच्या हस्ते पदार्पणाची कॅप घेताना कृणालला दाटून आलं आणि त्यानं भावाला लगेच मिठी मारली. त्यानंतर भरलेल्या डोळ्यांनी तो आकाशाकडे पाहू लागला आणि कॅप उंचावून वडिलांचे आभार मानले. फलंदाजीला आल्यानंतरही कृणालनं आक्रमक खेळ करताना पदार्पणात सर्वात जलद ( २६ चेंडू) अर्धशतक झळकावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला.

कृणालनं ३१ चेंडूंत ५९ धावांची खेळी केली आणि लोकेश राहुलसह ५७ चेंडूंत नाबाद ११२ धावा चोपून टीम इंडियाला ३१७ धावांपर्यंत मजल मारून दिली. अर्धशतकानंतरही कृणालनं हवेत बॅट उंचावून वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली.

या विक्रमी खेळीनंतर जेव्हा त्याला विचारण्यात आले, तेव्हा कॅमेरासमोर ढसाढसा रडणारा कृणाल सर्वांनी पाहिला. पप्पा ही खेळी तुमच्यासाठी, असे उद्गार त्याच्या तोंडून निघाले. डग आऊटमध्ये बसलेल्या हार्दिकच्या डोळ्यातही पाणी आले होते, परंतु भावाला सावरण्यासाठी त्यानं स्वतःच्या भावना व्यक्त केल्या नाही.

सामन्यानंतर हार्दिक पांड्यानं भावासाठी इमोशनल पोस्ट लिहिली. त्यानं लिहिलं की,''पप्पांना तुझा अभिमान वाटतोय. तुझ्या या खेळीनंतर त्यांना नक्कीच आनंद झाला असेल आणि वाढदिवसापूर्वी त्यांनीच तुला हे गिफ्ट दिलं आहे. तू याचा हकदार आहेस आणि तुझ्या आयुष्यात असेच आनंदाचे क्षण येत राहो. तुझ्या आनंदात माझा आनंद आहे.''

कृणालनंही पोस्ट लिहिली ( Krunal Pandya also took to Twitter to post). ''प्रत्येक चेंडू खेळताना माझ्या मनात फक्त आणि फक्त तुमचाच विचार सुरू होता, पप्पा. तुम्ही माझ्यासोबतच आहात, असे वाटत होते आणि त्यामुळे डोळे भरून आले होते. तुम्ही माझी ताकद आहात आणि मला तुमचा कायम पाठींबा मिळत राहिला, त्यासाठी तुमचे आभार. ही खेळी तुमच्यासाठीच आहे आणि यापुढे आम्ही जे काही करू, तेही तुमच्यासाठीच असेल,'' असे कृणालनं लिहिलं.

या सामन्यापूर्वी वडिलांची उणीव जाणवू नये यासाठी त्यांची टोपी, बूट व कपडे घेऊन पांड्या बंधू टीम इंडियाच्या ड्रेसिंगरुममध्ये पोहोचले. त्यांनी वडिलांच्या त्या वस्तू समोर ठेवत त्यांचे आशीर्वाद घेतले.

सुरत येथे हिमांशू यांचे कार फायनान्सचा बिस्नेस होता आणि तो त्यांनी बंद करून ते वडोदरा येथे स्थायिक झाले. त्यांनी दोन्ही मुलांना किरण मोरे क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळवून दिला. गोरवा येथे भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये ते रहायचे. क्रिकबजला दिलेल्या एका मुलाखतीत हिमांशू यांनी एक किस्सा सांगितला होता.

ते म्हणाले होते की,''आम्ही पूर्वी सुरतमध्ये रहायचो आणि तेव्हा कृणाल ६ वर्षांचा होता. मी घरातच त्याचा गोलंदाजी करायचो आणि त्यावर तो जोरदार फटके मारायचा. त्याची फलंदाजी पाहून तो चांगला क्रिकेटपटू बनेल असे मला वाटायचे. त्यानंतर मी त्याला सूरतमधील रांदेड जिमखाना येथे सरावासाठी घेऊन गेलो. तेथे भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांच्या मॅनेजरने त्याला फलंदाजी करताना पाहिले. त्यांनी आम्हाला वडोदराला यायला सांगितले आणि १५ दिवसानंतर कृणालला वडोदरा येथे घेऊन गेलो.''

हिमांशू दररोज ५० किलोमीटर बाईक चालवत कृणालला वडोदरात घेऊन जायचे. एवढेच नाही, तर ते कॉलेजच्या मुलांशी १००-१०० रुपयांची पैज लावायचे. माझ्या मुलाला जो बाद करेल त्याला १०० रुपये देईन, अशी ती पैज असायची. दीड-दोन तासांच्या फलंदाजीनंतरही त्याला कुणची बाद करू शकत नव्हता, असे हिमांशू यांनी सांगितले होते.