Great News : मोहम्मद सिराज, रिषभ पंत, टी नटराजन यांना मिळू शकतो ICCचा खास पुरस्कार!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रमुख खेळाडू जायबंदी होऊ संघाबाहेर होत असताना टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ०-१ अशा पिछाडीवरून टीम इंडियानं जबरदस्त कमबॅक करतान २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाच्या बेंच स्ट्रेंथची खरी कसोटी होती आणि त्यावर ते सर्व खरे उतरले. दोन कसोटी सामन्यांचा अनुभव असणाऱ्या मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) गॅबा कसोटीत टीम इंडियाच्या जलदगती गोलंदाजांचे नेतृत्व केलं आणि पाच विकेट्स घेत दमदार कामगिरीही केली. या मालिकेत सिराजनं भारताकडून सर्वाधिक १३ विकेट्स घेतल्या.

रिषभ पंतनं ( Rishabh Pant) आपल्या कामगिरीतून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं. सिडनी कसोटीतील ९७ धावा आणि गॅबा कसोटीतील नाबाद ८९ धावांच्या खेळीनं टीम इंडियाला जबरदस्त कमबॅक करून दिलं. या मालिकेत त्यानं पाच डावांत २७४ धावा चोपल्या.

याच मालिकेत वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन यांनीही कसोटी संघात पदार्पण केले. वॉशिंग्टननं गॅबावर शार्दूल ठाकूरसह खिंड लढवताना भारताच्या विजयाचा पाया रचला. वॉशिंग्टननं परफेक्ट अष्टपैलू म्हणून स्वतःला सिद्ध केले. टी नटराजनसाठी हा दौरा स्वप्नवत ठरला. याच दौऱ्यात त्यानं ट्वेंटी-20, वन डे आणि कसोटी संघांत पदार्पण केले.

भारताच्या या शिलेदारांना ICCचा खास पुरस्कार मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) बुधवारी नव्या पुरस्काराची घोषणा केली. ICC Player of the Month awards असे या पुरस्काराचे नाव असून प्रत्येकी महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पुरुष व महिला क्रिकेटपटूंना तो दिला जाणार आहे.

जानेवारी २०२१साठीच्या पहिल्याच पुरस्काराच्या शर्यतीत मोहम्मद सिराज, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर, रिषभ पंत ही नावं आघाडीवर आहेत. त्यांच्यासह रहमनुल्लाह गुरबाझ ( अफगाणिस्तान) , आर अश्विन ( भारत), जो रूट ( इंग्लंड) , स्टीव्ह स्मिथ ( ऑस्ट्रेलिया), मॅरिझाने कॅप ( दक्षिण आफ्रिका), नॅदीन डी क्लेर्क ( दक्षिण आफ्रिका), निदा दार ( पाकिस्तान) आदी खेळाडूंची नावेही चर्चेत आहेत.

माजी खेळाडू, ब्रॉडकास्टर आणि जगभरातील पत्रकार यांच्यासह फॅन्स या पुरस्कारांसाठी मतदान करू शकणार आहेत. आयसीसीचे सरचिटणीस जॉफ अॅलार्डीस म्हणाले,''या पुरस्काराच्या माध्यमातून चाहत्यांना क्रिकेटच्या अजून जवळ आणण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक महिन्यात खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करून त्यांचेही मनोबल उंचावले जाईल.''

विजेत्या खेळाडूची नावे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी केली जाईल, असे आयसीसीनं जाहीर केलं.