Fact Check : महेंद्रसिंग धोनीनं IPL २०२१मधून मिळणारा १५ कोटींचा पगार कोरोना लढ्यासाठी केला दान!

देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या अन् निर्माण झालेल्या अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीनं सर्वांना चिंता वाटू लागली होती. त्यात इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) च्या १४व्या पर्वातील सामने काही काळ का असेना या चिंताग्रस्त परिस्थितीतही अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत होते.

पण, आयपीएल २०२१ यशस्वी करण्यासाठी निर्माण केलेला बायो बबल कोरोनानं भेदला अन् एकामागून एक KKR, CSK, SRH व DC या संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे BCCI ला मंगळवारी आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता उर्वरित स्पर्धेसाठी सप्टेंबरच्या विंडोची चाचपणी बीसीसीआयकडून सुरू झाली आहे.

आयपीएलच्या माध्यमातून खेळाडूंनी मैदानावरूनच मनोरंजन केलं नाही, तर भारताच्या कोरोना लढ्यात अनेकानी त्यांच्या परीनं हातभार लावण्याचाही प्रयत्न केला. यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह भारताच्या खेळाडूंनीही पुढाकार घेतला.

भारताचा माजी कर्णधार व चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) त्याचा संपूर्ण १५ कोटींचा पगार कोरोना लढ्यात ऑक्सिजन खरेदीसाठी दान केल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ऑस्ट्रेलियाचा व कोलकाता नाईट रायडर्सचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्स ( ३७ लाख), ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट ली ( ४० लाख) व CSKचा गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फ यांनी भारताच्या कोरोना लढ्यात हातभार लावला.

भारताचा शेल्डन जॅक्सन यानं गौतम गंभीर फाऊंडेशनला आर्थिक मदत केली, शिखर धवन व अजिंक्य रहाणे यांनी ऑक्सिजन संच ( oxygen concentrator) साठी मदत केली.

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानं Mission Oxygen या मोहिमेत १ कोटींची मदत केली आहे.

आता महेंद्रसिंग धोनीनं १५ कोटी दान केल्याची चर्चा सुरू आहे. पण, अशी कोणतीच मदत धोनीकडून करण्यात आलेली नाही. तसे अधिकृतरित्या कोणी जाहीरही केलेले नाही. धोनीनं मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात १ लाखांची मदत केली होती.

महेंद्रसिंग धोनीनं ९० कसोटींत ४८७६ धावा ( ६ शतकं/३३ अर्धशतकं), ३५० वन डेत १०७७३ ( १० शतकं/७३ अर्धशतकं) धावा केल्या आहेत. ९८ ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर १६१७ धावा आहेत.