खूप कठीण काळाचा सामना करतेय चहलची पत्नी धनश्री वर्मा, सांगितली कहाणी...

भारतीय संघाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सध्या खूप कठीण काळाचा सामना करतेय.

भारतीय संघाचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती नेहमी तिचे खास फोटोज आणि व्हिडिओज पोस्ट करत असते. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिनं एकही पोस्ट केली नव्हती.

धनश्रीनं बरेच दिवस काहीच पोस्ट न केल्यानं तिच्या चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन तिच्या तब्येतीची विचारपूस करणं देखील सुरू केलं होतं.

अखेर धनश्रीनं तिच्या इन्स्टास्टोरीमधून याबाबतचा खुलासा केला आहे. धनश्री सध्या खूप कठीण काळाचा सामना करते आहे. "सोशल मीडियावर सक्रिय नसण्यामागचं एक कारण आहे. त्यामुळेच माझे नवे डान्स व्हिडिओज तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून दिसत नाहीयत", असं धनश्रीनं लिहिलं आहे.

"एप्रिल आणि मे महिना माझ्यासाठी खूप आव्हानात्मक राहिला आहे. आधी माझी आई आणि भाऊ यांना कोरोनाची लागण झाली. दोघांनाही जेव्हा कोरोनाची लागण झाली होती तेव्हा मी आयपीएलच्या बायो-बबलमध्ये होते. त्यामुळे काहीच मदत करता आली नाही. दरम्यान, मी सातत्यानं त्यांच्या संपर्कात होते. कुटुंबापासून दूर राहणं फार कठीण काम असतं", असं धनश्रीनं म्हटलं आहे.

सुदैवानं माझी आई आणि भाऊ दोघंही आता सुरक्षित आहेत. पण मी माझ्या काकीला कोरोनामुळे गमावलं आहे, अशी माहिती धनश्रीनं इन्स्टाग्रामवर दिली आहे.

धनश्रीनं पुढे खूप महत्वाची अपडेट दिली. "आता माझ्या सासरची मंडळी कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत. माझे सासरे म्हणजेच यजुवेंद्र चहलचे वडील कोरोनामुळे रुग्णालयात दाखल आहेत. तर सासू राहत्या घरीच क्वारंटाइन आहेत. मी रुग्णालयात होते आणि मी जे पाहिलंय ते खूप भयंकर आहे. मी काळजी घेतच आहे पण तुम्हीही काळजी घ्या, घरातच राहा आणि कुटुंबाची काळजी घ्या", असं धनश्रीनं म्हटलं आहे.

"लोकांनी गरजू व्यक्तींना मदत करत राहावी. जर तुम्ही घरात आहात आणि सुरक्षित आहात तर तुम्ही नक्कीच देवाचे आभार मानले पाहिजेत. प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा", असंही धनश्रीनं म्हटलं आहे.

"कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झालेला असताना अशा कठीण प्रसंगी डान्स करणं आणि त्याचे व्हिडिओ पोस्ट करणं हे योग्य वाटत नाही. पण मी लवकरच पुन्हा नव्यानं कामाला लागेन आणि कोरोनाविरुद्धची लढाई आपल्याला एकत्र मिळून लढावी लागणार आहे", असं आवाहन धनश्रीनं केलं आहे.

धनश्रीनं सोशल मडियात शेवटची पोस्ट 'मदर्स डे' दिवशी केली होती. त्यानंतर तिनं एकही पोस्ट केलेली नाही. त्यावरुन तिच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन विविध तर्कवितर्क लढवले जाऊ लागले.

त्यामुळेच धनश्रीनं इन्स्टास्टोरीच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना सविस्तर माहिती दिली आहे. धनश्रीच्या इन्स्टास्टोरीनंतर अनेकांनी तिला कुटुंबियांच्या काळजी घेण्याचं आणि ते बरे होण्यासाठी प्रार्थना करणार असल्यांच कमेंट बॉक्समध्ये नोंदवत आहेत.