Sachin Tendulkar लाही वाटलं होतं सोशल डिस्टन्सिंग वगैरे विसरावं; अंगावर शहारे आणणारा प्रसंग

कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 36 लाख 59,103 वर गेली आहे. त्यापैकी 2 लाख 52, 573 लोकांचा मृत्यू झाला असून 12 लाख 03,404 रुग्ण बरे झाले आहेत.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही 46,476 वर पोहोचली असून 1571 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पण, 12849 लोकं बरी झाली आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही लोकं अजूनही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करताना दिसत नाही.

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्यासोबतही असाच एक प्रसंग घडला होता,तेव्हा त्यालाही सोशल डिस्टन्सिंग वैगरे विसरावं असे वाटले होते.हा प्रसंग आहे 1998साली शारजाह येथे खेळवण्यात आलेल्या कोका कोला चषकातील आहे. 22 एप्रिल 1998मध्ये शाहजाह येथे तेंडुलकरचं वादळ घोंगावलं होतं.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील त्या सामन्यात 25 मिनिटं वाळवंटी वादळानं थैमान घातलं होतं. मैदानावरील खेळाडू प्रचंड घाबरले होते.

या वादळानंतर भारतासमोर सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते आणि त्यामुळे सचिन प्रचंड नाराज झाला होता. पण, त्यानं शेन वॉर्न, डॅमिएल फ्लेमिंग आणि मिचेल कॅस्प्रोव्हीच या गोलंदाजांची धुलाई करताना 131 चेंडूंत 143 धावा केल्या. तेंडुलकरच्या या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.

शारजाहत खेळवण्यात आलेला हा सामना वादळामुळे 25 मिनिटे थांबला होता. भारताला 50 षटकांत 285 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु वादळामुळे भारतासोर 46 षटकांत 276 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. भारत-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड अशा तीन देशांमध्ये ही मालिका खेळवण्यात आली होती आणि भारताला अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी 46 षटकांत 237 धावा करणे गरजेचे होते.

तेंडुलकरच्या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं 5 बाद 250 धावा केल्या. 26 धावांनी ऑस्ट्रेलियानं हा सामना जिंकला, परंतु तेंडुलकरची खेळी सुवर्ण अक्षरानं लिहिली गेली. अंतिम सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्स राखून विजय मिळवला. त्यातही तेंडुलकरनं 134 धावा चोपल्या.

या सामन्यातील प्रसंगाबद्दल सचिन म्हणाला,''वाळवंटाचे वादळ मी पाहिले नव्हते. मला वाटतं आता मी वादळासोबत उडून जाईन. अॅडम गिलख्रिस्ट माझ्या मागेच उभा होता. त्यामुळे त्याला पकडून उभे राहण्याचा विचार माझ्या डोक्यात होता. तेव्हा सोशल डिस्टन्सिंग विसरावं असं वाटलं होतं. पण, तितक्यात अम्पायरनी मैदान सोडून सगळ्यांना ड्रेसिंग रुममध्ये जाण्यास सांगितले.''