On this day in 2019: रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, कुमार संगकाराचा मोडला विक्रम अन् सचिन तेंडुलकरशी बरोबरी!

आजच्याच दिवशी बरोबर दोन वर्षांपूर्वी रोहित शर्मानं वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत इतिहासाची नोंद केली होती. वर्ल्ड कप स्पर्धेच्या एकाच पर्वात पाच शतकं झळकावणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला होता. त्यानं पाच शतकं झळकावून श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा यानं २०१५च्या वर्ल्ड कपमध्ये नोंदवलेल्या चार शतकांचा विक्रम मोडला.

२०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील तो सर्वात यशस्वी फलंदाज होता. त्यानं ८१च्या सरासरीनं सर्वाधिक ६४८ धावा केल्या. त्यानं संगकाराचा रेकॉर्ड मोडताना महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या वन डे वर्ल्ड कपमधील सर्वाधिक शतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ९४ चेंडूंत १०३ धावांची खेळी करताना त्यानं वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. २६५ धावांचा पाठलाग करताना रोहितनं १४व्या षटकात शतक साजरे केले. या सामन्यात लोकेश राहुलनंही १११ धावा केल्या. रोहित व राहुल यांनी १८९ धावांची विक्रमी भागीदारीही केली.

रोहितनं दक्षिण आफ्रिका ( १२२), पाकिस्तान ( १४०), इंग्लंड ( १०२), बांगलादेश ( १०४) आणि श्रीलंका ( १०३) या संघांविरुद्ध शतक झळकावले. पाकिस्तानविरुद्ध त्यानं तुफान फटकेबाजी केली.

वन डे क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर सर्वाधिक तीन द्विशतकं आहेत. त्यानं २२७ सामन्यांत ९२०५ धावा केल्या आहेत. त्यात २९ शतकं व ४३ अर्धशतकांचा समावेश आहे.