On This Day : रोहित शर्मानं साकारली इतिहासानं साक्ष ठेवावी अशी खेळी; कोलकातात झालेला विक्रम मोडणे अशक्य

भारतीय संघाचा सलामीवर रोहित शर्मानं नुकतंच इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) विक्रमी पाचव्यांदा आयपीएल जेतेपद पटकावलं.

कर्णधार म्हणून सर्वाधिक पाच जेतेपद पटकावणारा रोहित हा आयपीएल इतिहासातील एकमेव खेळाडू आहे. शिवाय रोहितच्या नावावर सर्वाधिक ६ आयपीएल जेतेपदं आहेत. पण, रोहित हा केवळ आयपीएलपुरता मर्यादित राहणारा फलंदाज नाही.

रोहितनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटही तितक्याच ताकदीनं गाजवलं आहे. म्हणून जग त्याला हिटमॅन या नावानं ओळखतं. आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 2 द्विशतकं करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. शिवाय त्यानं ८वेळा १५०+ धावा चोपल्या आहेत.

२०१३मध्ये रोहितनं आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील त्याचे पहिले द्विशतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरू वन डे सामन्यात त्यानं २०९ धावांची खेळी केली होती.

त्यानंतर त्यां २०१४ व २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्यानं द्विशतक झळकावले होते. यापैकी २०१४च्या द्विशतकाचा विक्रम कोणाला मोडणे शक्य होईल असे वाटत नाही.

१३ नोव्हेंबर २०१४मध्ये आजच्याच दिवशी कोलकाताच्या इडन गार्डनवर रोहितच्या बॅटीनं लंकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली होती.

श्रीलंकेविरुद्धच्या वन डे सामन्यात रोहितनं १७३ चेंडूंत ३३ चौकार व ९ षटकार खेचले होते. वन डे क्रिकेटमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.

रोहितच्या या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ४०४ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ ४३.१ षटकांत २५१ धावांत तंबूत परतला.