IPL 2021: 'हे तर Lays चं पाकीट'... ख्रिस गेल, यजुवेंद्र चहलच्या 'पोझिंग'वर भन्नाट मिम्स! एकदा पाहाच...

IPL 2021: आयपीएल म्हटलं की मनोरंजन आणि त्यात ख्रिस गेल म्हणजे मनोरंजनाचा बादशहा. गेल त्याच्या तडाखेबाज फलंदाजीनं तर मनोरंजन करतोच पण त्याच्या 'ऑफ द फिल्ड' मनोरंजनाचीही जोरदार चर्चा होत असते. अशीच एक चर्चा सद्या सुरूय जाणून घेऊयात...

आयपीएल म्हणजे मनोरंजन, थरार आणि त्यात ख्रिस गेलच्या तुफान फटकेबाजीचा तडका मिळाला तर क्रिकेट रसिकांचा दिवस सार्थकी लागतो. पण गेल नुसतं मैदानातच नाही तर मैदानाबाहेर देखील त्याच्या हटके स्टाइलनं सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो.

आयपीएलमध्ये शुक्रवारी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या सामन्यातही ख्रिस गेलचा धमाका पाहायला मिळाला. त्यासोबतच सामन्यानंतरच्या एका फोटोनं सोशल मीडियातही धुमाकूळ घातला आहे.

बंगलोर विरुद्धचा सामना पंजाबनं जिंकला यात ख्रिस गेलनं ४६ धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली होती. सामना संपल्यानंतर गेल आणि बंगलोरचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल यांनी टी-शर्ट काढून 'पोझिंग' केली. मग काय नेटिझन्सला नेमका मुद्दा मिळाला आणि धमाल मिम्स तयार झाले.

शरीरसौष्ठव स्पर्धेत पोज देतात, तशी पोज गेल-चहलने या फोटोत दिली. गेलच्या पिळदार शरीरयष्टीसमोर चहलचे काटक शरीर, अशा आशयाचे ट्विट करत पंजाबने बंगळुरूला कमकुवत म्हटले. त्यावरुनच नेटिझन्सनं कल्पनाशक्तीचा विस्तार करत गेल आणि चहल यांना विविध उपमा दिल्या आहेत.

ख्रिस गेल आणि यजुवेंद्र चहलची पोझ म्हणजे Lays कंपनीच्या वेफर्सच्या पाकिटासारखी आहे. पाकिटातील हवेला ख्रिस गेलची आणि वेफर्सना यजुवेंद्र चहलची उपमा दिली आहे.

एकानं तर ख्रिस गेलची शरीरयष्टी म्हणजे नवा कोरोनाचा स्ट्रेन आणि चहलची गेलच्या तुलनेतली कमकुवत शरीरयष्टी म्हणजे देशाची आरोग्य व्यवस्था अशीही तुलना करुन टीका केली आहे.

काहींनी विनोद शैलीला फुंकर देत ख्रिस गेलची शरीरयष्टी म्हणजे कर्मचाऱ्याचं लक्ष्य किंवा स्वप्न आणि यजुवेंद्र चहलची शरीरयष्टी म्हणजे वास्तवातील बँक बॅलंस अशी कोपरखळी मारली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध (आरसीबी) झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा (पीबीकेएस) अष्टपैलू खेळाडू हरप्रीत ब्रारने चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले. फलंदाजीत हरप्रीतने २५ धावांचे योगदान दिले, तर गोलंदाजीत त्याने विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलला बाद करत बंगळुरूचे कंबरडे मोडले.

पंजाबने ५ गडी गमवत १७९ धावा केल्या होत्या आणि विजयासाठी १८० धावांचे आव्हान दिले होते. मात्र बंगलोरचाचा संघ २० षटकांच्या अखेरीस ८ गडी गमावून केवळ १४५ धावा करू शकला.

पंजाब किंग्जनं विजय प्राप्त करत दोन गुणांची कमाई केली आणि पराभवाची मालिका खंडीत केली.