टेम्पो चालकाचा मुलगा, RCBचा नेटबॉलर अन् IPL 2021चा स्टार; चेतन सकारियानं केलीय धोनी, रैना, राहुल यांची शिकार!

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) राजस्थान रॉयल्सचा युवा गोलंदाज चेतन सकारिया ( Chetan Sakariya) यानं चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानं अंबाती रायुडू, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी या तीन स्टार फलंदाजांना बाद करून सोमवारचा दिवस गाजवला. याआधी त्यानं लोकेश राहुल, मयांक अग्रवाल व झाय रिचर्डसन या स्टार्सना बाद केले होते.

आयपीएल २०२०त रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) संघाचा नेट बॉलर ते IPL 2021मधील युवा स्टार हा प्रवास करण्यासाठी चेतन सकारियानं बरीच मेहनत घेतली आहे. त्याच्या या यशात सकारिया कुटुंबीयांचेही अनेक त्याग आहेत. मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चेतनच्या वडिलांनी काही काळ टेम्पोही चालवला.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेदरम्यान चेतनच्या भावानं आत्महत्या केली, परंतु दहा दिवस याची खबर सौराष्ट्रचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चेतनला कुटुंबीयांनी होऊ दिली नाही.

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) लिलावात गुजरातच्या चेतन सकारिया ( Chetan Sakariya) याला राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) १.२० कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. सौराष्ट्र संघाकडून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या चेतनचा हा प्रवास खाचखळग्यांचा आहे. डाव्याखुऱ्या जलदगती गोलंदाज सामान्य कुटुंबात जन्माला आला. पाच वर्षांपूर्वी त्याच्या घरी टीव्हीपण नव्हता आणि मॅच पाहण्यासाठी तो शेजाऱ्यांकडे किंवा बाजारातील दुकानात जायचा.

अशात चेतननं अभ्यास करावा आणि चांगली नोकरी करावी अशी त्याच्या वडीलांची इच्छा होती. मात्र, काकांनी चेतनला त्यांच्या दुकानात कामासाठी ठेवलं आणि त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलला. त्यांचा हा विश्वास चेतननं सार्थ ठरवला आणि कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्र क्रिकेटमध्ये प्रवेश केला. मागील वर्षी सौराष्ट्रला रणजी करंडक जिंकून देण्यात त्यानं महत्त्वाची भूमिका बजावली होती.

२८ वर्षीय चेतन हा भावनगर जिल्ह्यात राहतो. त्याचे वडिल कांजीभाई घराचा आर्थिक गाढा हाकण्यासाठी टॅम्पो चालवायचे. चेतननं क्रिकेटपटू व्हावं असं त्यांची इच्छा नव्हती. पण, चेतनच्या काकांनी त्याला मदत केली.

कूच बिहार ट्रॉफीत त्यानं सौराष्ट्रच्या १९ वर्षांखालील संघाकडून सहा सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या. त्यला एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये पाठवलं गेलं. पण, त्याच्याकडे बुटं नव्हती आणि शेल्डन जॅक्सननं त्याला बुटं दिली. नेट प्रॅक्टीसमध्ये मला बाद केलंस, तर बुटे देईन अशी पैज जॅक्सननं लावली आणि चेतननं ती जिंकली.

चेन्नई सुपर किंग्सच्या ९ बाद १८८ धावांच्या प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सला २० षटकांत ९ बाद १४३ धावाच करता आल्या आणि चेन्नईनं हा सामना ४५ धावांनी जिंकला. सॅम कुरननं २४ धावांत २, रवींद्र जडेजानं २८ धावांत २, तर मोईन अलीनं ७ धावांत ३ विकेट्स घेतल्या.