BCCIनं विराट कोहलीला खिजगणतीतही नाही धरलं; T20 World Cup साठी दोन मोठे निर्णय घेतले

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि BCCI यांच्यात सारं काही आलबेल नाही, हे आता हळुहळू स्पष्ट होत चाललं आहे. विराटला कर्णधारपदावरून काढण्यासाठी सहा महिन्यांपासून बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये खलबतं सुरू होती, परंतु ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या निकालापर्यंत थांबण्याचा पवित्रा सर्वानुमते घेतला गेला.

संघातील काही वरिष्ठ खेळाडूही विराटची तक्रार घेऊन बीसीसीआयकडे गेल्याच्या बातम्या मागील काही दिवसांत झळकत आहेत. मैदानाबाहेर विराटशी संपर्क साधणे सीनियर व युवा खेळाडूंना अवघड जात होते, असा दावा केला गेला. कम्युनिकेशन गॅप होती, असे अनेकांचे म्हणणे होते.

विराटला याचा सुगावा लागला आणि त्यानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपला एक महिना शिल्लक असतानाच वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले. विराटनं हा मास्टरस्ट्रोक खेळून स्वतःला हकालपट्टी होण्यापासून वाचवले, शिवाय बीसीसीआयलाही थेट इशारा दिला.

आता ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघावरून नवा वाद पेटताना दिसत आहे. बीसीसीआयनं यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० संघात नेतृत्व विराटच्या खांद्यावर जरी कायम ठेवले असले तरी त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) ची मेंटॉर म्हणून निवड केली.

ज्या आर अश्विनला इंग्लंड दौऱ्यावर विराटनं बाकावर बसवून ठेवले त्याला थेट ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघात स्थान देऊन बीसीसीआयनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. चार वर्षांनंतर आर अश्विनचे ट्वेंटी-२० संघात पुनरागमन होत आहे. आता हे दोन्ही महत्त्वाचे निर्णय विराटला न विचारता घेण्यात आले होते, अशी माहिती समोर येत आहे.

IANS नं दिलेल्या वृत्तातून ही धक्कादायक बातमी समोर आली असून विराट व बीसीसीआय यांच्यातील वाद टोकाला गेल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीच्या संघात विराटला युझवेंद्र चहल हवा होता, परंतु निवड समितीनं आर अश्विनची निवड केली.

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर