भारतीय महिलांनी इतिहास घडवण्याची संधी गमावली, ऑस्ट्रेलियाच्या पोरींनी चुकीच्या 'नो बॉल' वर बाजी मारली!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 06:37 PM2021-09-24T18:37:13+5:302021-09-24T18:55:38+5:30

बेथ मूनी, तहिला मॅग्राथ आणि निकोला कॅरी या ऑस्ट्रेलियन महिला फलंदाजांनी भारतीय महिला संघाला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. भारतीय महिला हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियातील वन डे सामन्यातील विजयी मालिका खंडित करतील असे वाटत होते, परंतु अखेरच्या चेंडूवरील चुकीच्या निर्णयानं सामना फिरला. ऑस्ट्रेलियानं सलग २६ वन डे सामने जिंकण्याचा पराक्रम केला.

बेथ मूनी, तहिला मॅग्राथ आणि निकोला कॅरी या ऑस्ट्रेलियन महिला फलंदाजांनी भारतीय महिला संघाला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले.

भारतीय महिला संघानं दुसऱ्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कमबॅक केले. प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २७४ धावांचा डोंगर उभा करून त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोंडीत पकडले. २०१८पासून वन डे सामन्यांत विजयी मालिका कायम राखणाऱ्या ऑसी संघांसमोरील हे सर्वात मोठे लक्ष्य ठरले. ( India score a formidable 274/7 – the highest total posted against Australia since the start of their ODI winning streak in 2018)

शेफाली वर्मा व स्मृती मानधना ( Smriti Mandhana ) यांनी संघाला आक्रमक सुरूवात करून देताना ११ षटकांत ७४ धावा जोडल्या. शेफाली २२ धावांवर माघारी परतली. कर्णधार मिताली राज दुर्दैवीरित्या ( ८) धावबाद झाली. यस्तिका भाटिया ( ३) काहीच कमाल न करता माघारी परतली.

पण, स्मृती मानधना व रिचा घोष यांनी टीम इंडियाची गाडी रूळावर आणली. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी ७६ धावा जोडल्या. स्मृती ९४ चेंडूंत ११ चौकारांसह ८६ धावांवर माघारी परतली. रिचानं ५० चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ४४ धावा केल्या. दीप्ती शर्मा ( २३), पूजा वस्त्राकर ( २९) आणि झुलन गोस्वामी ( २८*) यांनी महत्तपूर्ण योगदान देत संघाला २७४ धावांपर्यंत पोहोचवले.

झुलननं पहिल्याच षटकात ऑसी सलामीवीर अॅलिसा हिली ( ०) हिला त्रिफळाचीत केलं. कर्णधार मेग लॅनिंग ( ६), एलिसे पेरी ( २) व अॅश्लेघ गार्डनर ( १२) याही झटपट माघारी परतल्या. पण, बेथ मूनी व ताहिला मॅग्राथ यांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला व शतकी भागीदारी केली.

३९ व्या षटकात दीप्ती शर्मानं ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. मॅग्राथ ७७ चेंडूंत ७४ धावांवर माघारी परतली. मूनी व मॅग्राथ यांनी १२६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. ( India finally break the massive 126-run fifth-wicket stand, Deepti Sharma gets Tahlia McGrath out for 74.) पण, बेथ मूनीनं जबरदस्त फटकेबाजी केली.

अखेरच्या १० षटकांत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ८७ धावांची गरज असताना मूनीनं जबरदस्त फटकेबाजी केली. तिनं ११७ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीनं शतक पूर्ण केलं. तिला निकोला कॅरीची उत्तम साथ मिळाली. या दोघींनी सहाव्या विकेटसाठी झटपट अर्धशतकी धावा जोडल्या.

१२ चेंडूंत २३ धावा असा अटीतटीचा सामना रंगला. राजेश्वरी गायकवाडनं टाकलेल्या ४९व्या षटकात ऑसींनी १० धावा काढल्या आणि आता ६ चेंडूंत १३ धावा त्यांना करायच्या होत्या. संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज गोस्वामीच्या पहिल्याच चेंडूवर ३ व दुसऱ्या चेंडूवर २ धावा निघाल्या. आता त्यांना चार चेंडूंत ८ धावा करायच्या होत्या. त्यात गोस्वामीनं नो बॉल टाकला.

३ चेंडूंत ६ धावांची गरज होती अन् कॅरीनं १ धाव घेत मूनीला स्ट्राईक दिली. १ चेंडूंत ३ धावांची गरज असताना गोस्वामीनं फुलटॉसच्या प्रयत्नात नो बॉल फेकला अन् टीम इंडियानं विजयाची संधी गमावली. पण, या नो बॉलवरून वेगळाच वाद सुरू झाला.

बेन मूनी १३३ चेंडूंत १२ चौकारांसह १२५ धावांवर नाबाद राहिली, तर कॅरीनं ३८ चेंडूंत नाबाद ३९ धावा केल्या.