भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सर्वोत्तम वन डे संघातून रोहित शर्माला वगळले!

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट सामना हो दोन्ही देशांतील चाहत्यांसाठी एक पर्वणीच असतो. ऑस्ट्रेलिया हा भारतीय संघावर नेहमीच हावी पडलेला पाहताना मिळाला आहे, परंतु विराट कोहलीच्या युगात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली.

दोन्ही संघांमध्ये तोडीसतोड खेळाडू आहेत आणि त्यामुळेच भारत-ऑस्ट्रेलिया यांचा एकत्रिक वन डे एकादश संघ निवडताना गोची होणं साहजिकच आहे. पण, या संघातून हिटमॅन रोहित शर्माला वगळलं जाणं, ही न पटणारी बाब आहे.

ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार आणि सलामीवीर अ‍ॅरोन फिंच यानं भारत-ऑस्ट्रेलिया यांचा एकत्रित सर्वकालीन वन डे एकादश संघ निवडला आहे. त्यात त्यानं सलामीवीर म्हणून वीरेंद्र सेहवागची निवड केली. त्याच्या जोडीला त्यानं यष्टीरक्ष-फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्ट याचं नाव सहभागी करून घेतलं.

विशेष म्हणजे फिंचनं वीरूची निवड करताना रोहित शर्माला वगळले. ''सलामीसाठी सेहवाग हा माझी पहिली पसंती आहे. तो मैदानावर असेपर्यंत सामना कधी संपतो, हेही कळत नाही. मला रोहित शर्मालाही घ्यायचे होते, त्याचे विक्रम अविश्वसनीय आहेत, परंतु सेहवागसोबत गिलख्रिस्टला फलंदाजी करताना मला पाहायला आवडेल,'' असे फिंच म्हणाला.

फिचनं तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी अनुक्रमे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांची निवड केली आहे.

त्यानंतर फिंचनं हार्दिक पांड्या व अँण्ड्य्रू सायमंड या दोन अष्टपैलू खेळाडूंची निवड केली आहे.

गोलंदाजी विभागात त्यानं ब्रेट ली, जसप्रीत बुमराह आणि ग्लेन मॅकग्राह यांना स्थान दिले आहे.

असा आहे फिंचनं निवडलेला संघ - वीरेंद्र सेहवाग, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, विराट कोहली, हार्दिक पांड्या, अँण्ड्य्रू सायमंड, महेंद्रसिंग धोनी, ब्रेट ली, जसप्रीत बुमराह आणि ग्लेन मॅकग्रा, ( फिरकी गोलंदाज निश्चित नाही).