विराट कोहलीनंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण? माजी खेळाडूनं सांगितलं 'या' खेळाडूचं नाव

महेंद्रसिंग धोनीनंतर टीम इंडियाचे कर्णधारपद विराट कोहलीनं ( Virat Kohli) सक्षमपणे पेललं.. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 71 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत पराभवाची चव चाखवली.

विराटच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाला ICC स्पर्धा जिंकता आल्या नसल्या तरी परदेशात विराट अँड सेनेनं विजयी पताका फडकावला आहे. पण, आता विराटनंतर टीम इंडियाचे नेतृत्व कोणाकडे जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा यानं या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यानं टीम इंडियातील एक युवा खेळाडू विराटनंतर कर्णधारपद सक्षमपणे सांभाळू शकतो, असा दावा केला आहे. पण, त्याचवेळी त्या युवा खेळाडूची IPL2020त कशी कामगिरी होते, यावरही लक्ष ठेवावे लागेल, असेह चोप्रा म्हणाला.

मागील काही मालिकांमध्ये विराटला चांगली कामगिरी करता आलेली नाही. कर्णधारपदचे जास्त दडपण कोहलीवर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आता भारताच्या नवीन कर्णधारासाठी चाचपणी सुरु झाली आहे, असे म्हटले जात आहे.

एका चाहत्याने कोहलीनंतर भारताचा कर्णधार कोण असेल, हा आकाश चोप्राला एक प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना आकाश म्हणाला की, " विराट आणि रोहित यांचं वय जवळपास सारखे आहे. भारताला विराटनंतर कर्णधार शोधायचा असेल तर तो युवा क्रिकेटपटू असायला हवा. माझ्यामते विराटनंतर टीम इंडियाचे कर्णधारपद हे लोकेश राहुलकडे ( KL Rahul) जाऊ शकते.''

'' कर्णधार म्हणून राहुल कसा आहे, हे लवकरच IPL 2020त समजेल. IPLमध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाबच्या ( Kings XI Punjab) संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. त्यामुळे तो काय रणनिती आखतो आणि खेळाडूंचे व्यवस्थापन कसे करतो, ते लवकरच सर्वांना समजू शकते,''असेही चोप्रा म्हणाला.

चोप्रा पुढे म्हणाला की, "प्रत्येक कर्णधाराच्या आयुष्यात एक वेळ अशी येते. त्याला संघाचे नेतृत्व कोणाला तरी सोपवावे लागते. महेंद्रसिंग धोनीने कोहलीकडे नेतृत्व सोपवले. त्यामुळे विराटलाही आपल्या कर्णधारपदाचा भार कोणाला तरी नक्कीच द्यावा लागेल. कोहली असे करेल तेव्हा यादीमध्ये लोकेशचे सर्वात पहिले नाव असेल."

Read in English