इमारतींच्या पुनर्बाधणीभोवती फिरतेय वाशीतील निवडणूक; गावठाण, होल्डिंग पाँडसह समस्यांवर लक्ष
By नामदेव मोरे | Updated: January 10, 2026 10:32 IST2026-01-10T10:31:58+5:302026-01-10T10:32:13+5:30
नवी मुंबईमधील महत्त्वाच्या विभागांमध्ये वाशीचा समावेश होतो. मुंबईचे प्रवेशद्वार असलेले वाशी गाव या विभागात येते.

इमारतींच्या पुनर्बाधणीभोवती फिरतेय वाशीतील निवडणूक; गावठाण, होल्डिंग पाँडसह समस्यांवर लक्ष
- नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बाधणीच्या विषयावर वाशी विभागातील निवडणूक फिरत आहे. वाशीसह जूगाव या मूळ गावातील समस्या, वाहतूक कोंडीसह इतर प्रश्नांवर निवडणुकीत उमेदवारांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. उमेदवार निश्चितीपासून येथील तीन प्रभागांमध्ये हायहोल्टेज चुरस पाहावयास मिळत असून मोठ्या सभांपेक्षा घरोघरी व समाज माध्यमांवरील प्रचारावर उमेदवारांनी भर दिला आहे.
नवी मुंबईमधील महत्त्वाच्या विभागांमध्ये वाशीचा समावेश होतो. मुंबईचे प्रवेशद्वार असलेले वाशी गाव या विभागात येते. जूगावचा काही भाग व सिडको विकसित परिसरासह पामबीचवरील वसाहतींमध्ये विभागलेल्या तीन प्रभागामध्ये उमेदवारी निश्चितीपासून कमालीची चुरस होती. एका प्रभागातील उमेदवारी रद्द झालेल्या उमेदवाराने न्यायालयात धाव घेतल्याचा मुद्दाही गाजत आहे. सिडकोने बांधलेल्या इमारती धोकादायक झाल्या असून त्यांच्या पुनर्बाधणीच्या विषयावर येथील निवडणूक केंद्रिभूत झाली आहे. मतदारांसाठीही पुनर्बाधणी हाच जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. संपूर्ण निवडणूक या मुद्यावर केंद्रित झाली आहे. उमेदवारांनी सभा घेण्यापेक्षा घरोघरी प्रचारावर भर दिला आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोपामध्ये नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित आहेत. येथील होल्डिंग पाँडची स्वच्छता रखडली आहे. वाशी-कोपरखैरणे रस्ता, मोराज सर्कलवरील वाहतूक कोंडी या समस्याही गंभीर असून कोण उमेदवार प्रश्न सोडवणार की फक्त आश्वासनेच मिळणार, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. शिंदेसेना व भाजपमध्ये तीनही प्रभागांत चुरस असून आघाडीचे घटक पक्ष व अपक्षांनीही नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला आहे.
वाशीतील प्रमुख समस्या
वाशी व जूगावमधील प्रकल्पग्रस्तांची घरे व इतर प्रश्न प्रलंबित आहेत
वाशी - कोपरखैरणे रोडवर वाहतूककोंडीची समस्या गंभीर
पामबीच रोडवरील मोराज सर्कलजवळ वाहतूककोंडी
पाकिंगचा विषय गंभीर झाला असून रोडवर वाहने उभी करावी लागत आहेत.
होल्डिंग पाँडमध्ये गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमता कमी होत आहे.
अनधिकृत फेरीवाले व मार्जिनल स्पेसमधील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची गैरसोय.
जलवाहिन्यांचे सुधारित जाळे गरजेचे
इमारतींच्या पुनर्बाधणीबरोबरच मलनिस्सारण व जलवाहिनीचे सुधारित जाळे तयार करणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधींना पाठपुरावा करावा लागणार आहे.