'दहा वर्षे कुठे होतात?', मतदारांच्या प्रश्नाने बहुतांश उमेदवार अनुत्तरीत
By कमलाकर कांबळे | Updated: January 5, 2026 09:58 IST2026-01-05T09:58:19+5:302026-01-05T09:58:50+5:30
गतनिवडणुकीत निवडून आल्यानंतर अनेक उमेदवारांनी प्रभागासह मतदारांकडे पाठ फिरवली होती. स्थानिक प्रश्न, नागरिकांशी संवाद हे दहा वर्षांत दुय्यम ठरले.

'दहा वर्षे कुठे होतात?', मतदारांच्या प्रश्नाने बहुतांश उमेदवार अनुत्तरीत
- कमलाकर कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अर्ज माघारीनंतर रिंगणात असलेल्या ४९९ उमेदवारांनी आपल्या प्रचारास जोमाने सुरुवात केली आहे. यात प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात अनेकांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागल्याचे दिसून आले. आतापर्यंत पाणीटंचाई, अनधिकृत फेरीवाले, सार्वजनिक वाहतुकीचे वाजलेले तीनतेरा यामुळे त्रस्त झालेल्या मतदारांनी मते मागायला येणाऱ्या उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडल्याची चित्र पाहायला मिळत आहे.
गतनिवडणुकीत निवडून आल्यानंतर अनेक उमेदवारांनी प्रभागासह मतदारांकडे पाठ फिरवली होती. स्थानिक प्रश्न, नागरिकांशी संवाद हे दहा वर्षांत दुय्यम ठरले. या काळात माजी नगरसेवकांचे पालिकेशी संबंध हे बहुतांशी कंत्राटे, शिफारशीपुरतेच मर्यादित राहिल्याचे दिसले.
प्रस्थापित पुन्हा सक्रिय
आता निवडणुकीची चाहूल लागताच वर्षभरापासून हेच प्रस्थापित पुन्हा सक्रिय झाले होते. दहा वर्षात मतदारांशी फटकून वागणारे अनेक चेहरे आता मत मागताना अचानक अदबीने, प्रेमाने आणि आपुलकीने संवाद साधताना दिसत आहेत. हात जोडणे, आठवणी काढणे, विकासाची आश्वासने देणे, हे सारे दृश्य मतदारांनी याआधीही पाहिलेले आहे.
दहा वर्षांत अनधिकृत बांधकामांचा स्फोट
दहा वर्षांच्या प्रशासकीय काळात शहरात अनधिकृत बांधकामांचा वेग प्रचंड वाढला. प्रभागनिहाय पाहणी केली असता निवासी, व्यावसायिक तसेच मिश्र वापराच्या इमारती नियम धाब्यावर बसवून उभ्या राहिल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे याच काळात बेकायदा झोपड्यांचाही पसारा वाढला. याच झोपड्या अनेक प्रस्थापितांची व्हॉटबँक ठरली आहे. फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे.
महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून शहराच्या विविध भागांत बांधलेल्या बहुउद्देशीय वास्तू वापराविना धूळखात पडून आहेत. सध्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या माजी नगरसेवकांनी या सर्व मुद्यांना सोयिस्कररीत्या बगल दिली. तरुण आणि सुजाण मतदारांना हा प्रश्नसुद्धा सतावताना दिसत आहे.