कामगार नाक्यांवरही दिसू लागले निवडणुकीचे रंग
By कमलाकर कांबळे | Updated: December 27, 2025 10:19 IST2025-12-27T10:19:30+5:302025-12-27T10:19:43+5:30
शहरातील विविध भागांतील कामगार नाके सध्या केवळ रोजंदारी मिळविण्याचे ठिकाण न राहता, निवडणूकपूर्व हालचालींचे केंद्र बनले आहेत.

कामगार नाक्यांवरही दिसू लागले निवडणुकीचे रंग
- कमलाकर कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता हळूहळू शहराच्या रस्त्यांवर, चौकांत आणि थेट कामगार नाक्यांपर्यंत पोहोचू लागली आहे. विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून प्रत्यक्ष प्रचार सुरू होणार आहे. मात्र, त्याआधीच संभाव्य उमेदवारांनी प्रचारयंत्रणेची चाचपणी सुरू करून प्रचारासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेकडे विशेष लक्ष दिले आहे.
शहरातील विविध भागांतील कामगार नाके सध्या केवळ रोजंदारी मिळविण्याचे ठिकाण न राहता, निवडणूकपूर्व हालचालींचे केंद्र बनले आहेत. सकाळी नेहमीप्रमाणे मजुरीसाठी जमणाऱ्या महिला व पुरुष कामगारांशी ठेकेदारांच्या माध्यमातून संपर्क साधला जात असून, आगामी प्रचारासाठी त्यांची गोळाबेरीज सुरू झाल्याचे दिसून येते.
महिला मजुरांचा सहभाग वाढणार!
यंदा महिला मजुरांचाही प्रचारात सहभाग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घराघरांत संपर्क साधणे, पत्रके वाटणे, यासाठी महिला मनुष्यबळाचा वापर करण्याची रणनीती आखली जात आहे.
एकीकडे महापालिका निवडणुकीची अधिकृत रणधुमाळी सुरू होण्यास अजून काही दिवस बाकी असले, तरी कामगार नाक्यांवर दिसणारी ही हालचाल शहरातील राजकीय तापमान वाढल्याचे स्पष्ट संकेत देत आहे. कामगार नाके आता निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्याचे साक्षीदार ठरत आहेत.
प्रचार काळात झेंडे लावणे, बॅनर उभारणे, पत्रके वाटप, रॅली व सभा यांसाठी गर्दी जमवणे, तसेच विविध कार्यक्रमांच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज भासते. याच गरजेतून संभाव्य उमेदवारांकडून आतापासूनच काही मजुरांना अल्प कालावधीसाठी काम देऊन त्यांची उपलब्धता, शिस्त आणि प्रतिसाद तपासला जात आहे.