तीन दशकांत ५६ हजार कोटींची गंगाजळी; २० जणांनी सांभाळली तिजोरीची चावी
By नामदेव मोरे | Updated: December 25, 2025 11:12 IST2025-12-25T11:12:23+5:302025-12-25T11:12:34+5:30
दोघांची हॅटट्रिक, दाेन महिलांनाही स्थायी समितीच्या सभापतीपदी संधी

तीन दशकांत ५६ हजार कोटींची गंगाजळी; २० जणांनी सांभाळली तिजोरीची चावी
- नामदेव मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ग्रामपंचायतीमधून महापालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका. स्थायी समिती ही महापालिकेची तिजाेरी समजली जाते. या तिजोरीची चावी सभापती म्हणून २० जणांनी सांभाळली. दोघांनी हॅटट्रिक केली असून दोन महिलांनाही संधी देण्यात आली आहे. तीन दशकामध्ये पालिकेने तब्बल ५५ हजार ८०३ कोटी रुपयांची गंगाजळी प्राप्त केली आहे. यातून हजारो कोटींची विकासकामे केली असून यामध्ये स्थायी समितीचा महत्त्वाचा वाटा आहे.
देशातील श्रीमंत महापालिकेत नवी मुंबईचाही समावेश होतो. शासनाने दिघा ते बेलापूरपर्यंतच्या सर्व ग्रामपंचायती विसर्जित करून १९९२ मध्ये या महापालिकेची स्थापना केली.
पहिले सभापती बिराजदार
१९९५ मध्ये महापालिकेची पहिली निवडणूक झाली व पहिले स्थायी समिती सभापती म्हणून शशिकांत बिराजदार यांची नियुक्ती करण्यात आली.
पहिलाच अर्थसंकल्प ७९ कोटी ३४ लाख रुपयांचा तयार केला होता. परंतु, वर्षभरात १८ कोटी ५८ लाख रुपये महसूल मिळविता आला.
तेव्हापासून प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या महसुलात वाढ होत गेली व अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प महानगरपालिकेने प्रत्यक्षात साकार केले.
तीन दशकामध्ये अर्थसंकल्प ७९ कोटी रुपयांवरून ५७०९ कोटी रुपयांवर पोहचला आहे.