Rain disrupts publicity rallies | पावसामुळे प्रचार रॅलींना व्यत्यय
भाजपचे उमेदवार आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रचाररॅलीत त्यांच्या समवेत भुषण कासलीवाल व अन्य नेते, कार्यकर्ते.

ठळक मुद्देसकाळच्या सत्रात प्रचार । सायंकाळी थंडावला; मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांच्या प्रचार रॅलींना शनिवारी दुपारी जोरदार कोसळलेल्या पावसामुळे काही ठिकाणी व्यत्यय आला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे अखेर प्रचार रॅली स्थगित करून मतदारांशी व्यक्तिगत भेटीगाठी व भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. तर काही ठिकाणी मात्र उमेदवारांनी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन घडविले. या रॅलींमध्ये समर्थक युवक व महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसून आला.
गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली उमेदवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची पायपीट शनिवारी सायंकाळी ५ वाजता थांबली. तत्पूर्वी उमेदवारी दाखल केल्यानंतर मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
केला. त्यासाठी मेळावे,
बैठका, गृहभेटी, चौकसभा घेण्यात आल्या. प्रचारपत्रकांच्या माध्यमांतून सर्वच उमेदवारांनी आपली भूमिका व मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले असून, यंदाही प्रचारात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करण्यात आला आहे. त्या माध्यमातून राजकीय टिपाटिप्पणी व आरोप-प्रत्यरोपांची राळ उठविण्यात आली. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारासाठी सर्वच राज्यस्तरीय नेत्यांनी नाशिक शहर व जिल्ह्यात हजेरी लावून जाहीरसभा घेतल्या. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरण ढवळून निघाले होते.
शनिवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार असल्याचे पाहून आदल्या दिवसापासूनच उमेदवारांनी शनिवारी सकाळी शक्तिप्रदर्शन करीत प्रचार रॅली काढण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार काही उमेदवारांनी सकाळी १० वाजता आपापल्या संपर्क कार्यालयापासून प्रचार रॅली काढली. काही उमेदवारांनी ढोल-ताशांच्या गजरात शक्तिप्रदर्शन केले, तर काहींनी ध्वनिक्षेपकाचा वापर केला.
प्रमुख मार्गावरून प्रचार रॅली जात असतानाच, दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. अवघ्या काही वेळातच पावसाने जोर धरल्यामुळे रॅलीतील उमेदवार व कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. काहींनी रॅली आहे त्याच ठिकाणी उभी करून पाऊस थांबण्याची वाट पाहिली तर काही रॅली जागेवरच स्थगित करण्यात आल्या. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने उमेदवारांना त्यांचा जाहीर प्रचार दुपारनंतर संपुष्टात आणावा लागला.
सायंकाळी ५ वाजता प्रचाराची मुदत संपल्यावर उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाबाहेर लावलेले फलक, झेंडे, बॅनर तातडीने काढून घेण्यात आले, तर काही ठिकाणी निवडणूक भरारी पथकांनी सदरचे प्रचार साहित्य काढून घेण्याच्या सूचना केल्या. आता उमेदवारांचा जाहीर प्रचार संपुष्टात आला असून, येत्या २४ तासांत उमेदवारांच्या व्यक्तिगत भेटी-गाठींच्या माध्यमातून तसेच छुप्या मार्गाने प्रचाराला उधाण येणार आहे.येवला, मालेगाव बाह्य लढतीकडे लक्षयेवला मतदारसंघातून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, सेनेचे संभाजी पवार यांचेसह ८ उमेदवार रिंगणात आहेत. तर मालेगाव बाह्य मतदारसंघात ग्रामविकासमंत्री दादा भुसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आणि अन्य ७ उमेदवार लढतीत आहेत. या दोन्ही लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. नांदगाव मतदारसंघातून राष्टÑवादीचे पंकज भुजबळ, शिवसेनेचे सुहास कांदे आणि भाजपचे बंडखोर उमेदवार रत्नाकर पवार यांचेसह १५ उमेदवार रिंगणात आहेत. चांदवडमध्ये आमदार राहुल आहेर व माजी आमदार शिरीष कोतवाल तसेच अन्य ७ उमेदवार लढत देत आहेत. मालेगाव मध्य मतदारसंघातदेखील कॉँग्रेसचे विद्यमान आमदार आसिफ शेख व एमआयएमचे मौलाना मुफ्ती, भाजपच्या वारुळे यांच्याबरोबरच अन्य १० उमेदवार नशीब अजमावत आहेत. निफाड मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल कदम, राष्टÑवादीचे माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्य व बहुजन विकास आघाडीचे उमेदवार यतिन कदम यांचेसह अन्य ४ उमेदवार लढत देत आहेत. सटाण्यातही राष्टÑवादीच्या विद्यमान आमदार दीपिका चव्हाण यांच्या विरुद्ध भाजपचे माजी आमदार दिलीप बोरसे यांनी आव्हान दिले असून, अन्य ४ उमेदवार नशीब अजमावत आहेत. कळवण मतदारसंघातील माकपाचे आमदार जिवा पांडू गावित, राष्ट्रवादीचे नितीन पवार व सेनेचे मोहन गांगुर्डे यांच्यासह एकूण ६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकीनिमित्त राष्टÑीय व राज्यस्तरिय नेत्यांनी जिल्ह्यातील रणमैदान गाजविल्यानंतर शनिवारी दिवसभर राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करीत जाहीर प्रचाराला पूर्णविराम दिला. सायंकाळी ६ वाजता प्रचाराचे ताबूत थंडावल्यानंतर राजकीय पक्षांसह अन्य उमेदवारांचे कार्यकर्ते मतदानाच्या तयारीत गुंतले.

Web Title: Rain disrupts publicity rallies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.