केमिकलमिश्रित पाणी पिल्याने सोनेवाडीत ८ मेंढ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 00:01 IST2021-02-22T22:40:26+5:302021-02-23T00:01:08+5:30
ओझर टाऊनशिप : येथून जवळच असलेल्या सोनेवाडी येथे नाल्यातून वाहत जाणारे केमिकलमिश्रित पाणी पिल्यामुळे आठ मेंढ्यांचा मृत्यू झाला असून, ३२ मेंढ्या अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर घटनास्थळीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार केले जात आहेत.दरम्यान, या घटनेसंदर्भात ओझर पोलिसांत नोंद करण्यात आली असून, भरपाई मिळण्याची मागणी नुकसानग्रस्त मेंढपाळाने केली आहे.

केमिकलमिश्रित पाणी पिल्याने सोनेवाडीत ८ मेंढ्यांचा मृत्यू
ओझर टाऊनशिप : येथून जवळच असलेल्या सोनेवाडी येथे नाल्यातून वाहत जाणारे केमिकलमिश्रित पाणी पिल्यामुळे आठ मेंढ्यांचा मृत्यू झाला असून, ३२ मेंढ्या अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर घटनास्थळीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार केले जात आहेत.दरम्यान, या घटनेसंदर्भात ओझर पोलिसांत नोंद करण्यात आली असून, भरपाई मिळण्याची मागणी नुकसानग्रस्त मेंढपाळाने केली आहे.
ओझर गावातून तसेच परिसरातून तेलाचे रिकामे डब्बे आणून ते केमिकलने स्वच्छ करण्याचे व ते डबे पुन्हा तेल गिरण्यांना विक्री करण्याचा अनधिकृत व्यवसाय सोनेवाडी येथे सुरु आहे. हे डबे धुतल्यानंतर केमिकलचे पाणी नाल्यात वाहत जाते. याच परिसरात दत्तू पल्हाळ यांच्या मेंढ्या चरायला जात असतात. त्या मेंढ्यांनी तहान लागल्यावर नाल्यातील पाणी पिल्यामुळे ही दुर्घटना घडली. आठ मेंढ्यांचा तत्काळ मृत्यू झाला तर ३२ मेंढ्या अत्यवस्थ आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी वानखेडे यांनी घटनास्थळी जाऊन त्या मेंढ्यांवर औषधोपचार केले. घटनेचे वृत्त समजताच तलाठी उल्हासराव देशमुख यांनी पंचनामा केला. तसेच पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन यासंदर्भात ओझर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. मेंढपाळ पल्हाळ यांनी मेंढ्या हेच आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याने आम्हाला भरपाई मिळावी, अशी मागणी केली. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी घटना स्थळी भेट देऊन सदर डबेवाल्याच्या व्यवसायास ग्रामपंचायतीने कोणतीही परवानगी दिलेली नसून व तशी नोंदही नाही. त्यामुळे या घटनेबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
अनधिकृत व्यवसाय
तेलाचे डबे केमिकलच्या पाण्याने स्वच्छ करण्याच्या या व्यवसायास ग्रामपालिकेने कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेला नाही. ते वाहत जाणारे पाणी नाल्यात जात असल्यामुळे परिसरांत दुर्गंधी पसरत असल्याचे सोनेवाडीच्या ग्रामस्थांनी सांगितले. संबंधितास सांगूनही त्याचा व्यवसाय थांबला नाही व विरोध करणाऱ्यांशीच तो हमरीतुमरी करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.