लग्न मंडपाजवळून गेल्याच्या रागातून जमावाची मारहाण, दोन युवक जखमी
By मनोज शेलार | Updated: May 8, 2023 19:30 IST2023-05-08T19:29:57+5:302023-05-08T19:30:05+5:30
नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्न मंडपाजवळून गेल्याच्या रागातून जमावाची मारहाण, दोन युवक जखमी
नंदुरबार : लग्न मंडपाजवळून गेल्याच्या रागातून जमावाने केलेल्या मारहाणीत साक्री येथील दोन युवक जखमी झाल्याची घटना नंदुरबारातील जगतापवाडी भागात घडली. याप्रकरणी जमावाविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील जगतापवाडी भागातील महादेवनगर येथे लग्न समारंभासाठी मंडप टाकण्यात आला होता. त्या परिसरातून अभिषेक कैलास मोरे व नीलेश भाऊसाहेब अजगे (रा. वसमार, ता. साक्री) हे युवक जात होते. त्यावेळी राम मोतिलाल माळी व इतरांनी त्यांना याबाबत जाब विचारला. त्यातून त्यांच्यात वाद झाला. माळी व इतरांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तेथे पडलेल्या खुर्च्या व इतर साहित्याने पाठीवर, हातावर, पोटावर मारहाण करून दुखापत केली.
जमावाच्या तावडीतून कशीबशी त्यांनी सुटका केली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत अभिषेक कैलास मोरे याने फिर्याद दिल्याने राम मोतीलाल माळी (३०) व इतर १० ते १२ जण (सर्व रा. जगतापवाडी) यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार रवींद्र पवार करीत आहेत.