तळोदा तालुक्यात दोन एकर टरबूज व डांगर मळ्यांची नासधूस
By भूषण.विजय.रामराजे | Updated: March 27, 2023 19:01 IST2023-03-27T19:00:52+5:302023-03-27T19:01:19+5:30
तळोदा तालुक्यात दोन एकर टरबूज व डांगर मळ्यांची नासधूस झाली.

तळोदा तालुक्यात दोन एकर टरबूज व डांगर मळ्यांची नासधूस
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील काजीपूर तलावडी शिवारातील शेतात लागवड केलेल्या टरबूज आणि डांगराच्या पिकाचे अज्ञात व्यक्तीने नुकसान केल्याचा प्रकार रविवारी सकाळी समोर आला. अज्ञातांनी तब्बल २ एकर शेतीपिकांचे नुकसान केल्याची माहिती समोर आली आहे. तळोदा येथील अरुण नरेश पाडवी यांच्या मालकीच्या काजीपूर तलावडी शिवारातील शेतात हा प्रकार घडला. त्यांनी तीन एकरात टरबूज आणि तीन एकर क्षेत्रात डांगरची लागवड करण्यात आली होती.
दरम्यान, शनिवार रात्र ते रविवार पहाटे दरम्यान अज्ञातांनी त्यांच्या शेतात प्रवेश करत तब्बल दोन एकरातील टरबूज आणि डांगर तोडून फेकून दिले. सकाळी शेतकरी अरुण पाडवी हे शेतात गेले असता, हा प्रकार समोर आला. याप्रकरणी त्यांच्याकडून पोलिसात माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तळोदा तालुक्यात केळी, पपई, टरबूज आणि डांगरचे पीक कापून फेकण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यावर पोलिसांनी मार्ग काढण्याची मागणी केली आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांनीही पोलीस यंत्रणेला शेतकऱ्यांनी संपर्क केल्यास गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.