तरुणीला ठार केल्याच्या रागातून तरुणाच्या घरातील वस्तूंची जाळपोळ

By मनोज शेलार | Updated: January 29, 2024 17:42 IST2024-01-29T17:42:26+5:302024-01-29T17:42:45+5:30

घरात घुसून सर्व संसारोपयोगी सामान बाहेर फेकले आणि नंतर त्याला आग लावून जाळून टाकले.

The young mans house was set on fire out of anger for killing the young woman | तरुणीला ठार केल्याच्या रागातून तरुणाच्या घरातील वस्तूंची जाळपोळ

तरुणीला ठार केल्याच्या रागातून तरुणाच्या घरातील वस्तूंची जाळपोळ

नंदुरबार : नाशिक येथे शिक्षणासाठी असलेल्या गावातीलच तरुण-तरुणींचा वाद होऊन त्यातून तरुणीचा खून झाल्याची घटना गेल्या आठवड्यात नाशिक येथे घडली होती. त्या घटनेचा बदला म्हणून मुलीकडील नातेवाईक व जमावाने मुलाच्या घरी जाऊन जाळपोळ केल्याची घटना पाटबाराचा मौलीपाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली. या प्रकरणी रविवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिस सूत्रांनुसार, पाटबाराचा मौलीपाडा, ता.अक्कलकुवा येथील तरुण व तरुणी नाशिक येथे शिक्षणासाठी आहेत. गेल्या आठवड्यात तरुणीला ओढणीने गळफास लावून ठार करीत, तिचा मृतदेह निर्जनस्थळी टाकून देण्यात आला होता. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. या घटनेचा राग मनात धरून मुलीकडील नातेवाईक व जमावाने दोन वाहने भरून पाटबाराचा मौली गव्हाणपाडा येथे जाऊन मुलाच्या घरी धडक दिली. यावेळी घरात घुसून सर्व संसारोपयोगी सामान बाहेर फेकले. नंतर त्याला आग लावून जाळून टाकले. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत फतुबाई शिवादास तडवी यांनी फिर्याद दिल्याने राहुल सायसिंग वसावे (३०), अजित सायसिंग वसावे (२८) रा.पाटबारा, ता.अक्कलकुवा यांच्यासह २० ते २५ जणांच्या जमावाविरुद्ध मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार करीत आहेत.

Web Title: The young mans house was set on fire out of anger for killing the young woman