बनावट शासकीय शिक्के तयार करणाऱ्या शहादा येथील तिघांना पोलिसांकडून अटक
By भूषण.विजय.रामराजे | Updated: March 20, 2023 18:26 IST2023-03-20T18:25:30+5:302023-03-20T18:26:33+5:30
शहादा शहरात दिव्यांग बांधवांना महसूल, ग्रामविकास, परिवहन महामंडळांकडून देण्यात येणाऱ्या सवलतीच्या प्रमाणपत्रांवर बोगस शिक्के मारून देणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

बनावट शासकीय शिक्के तयार करणाऱ्या शहादा येथील तिघांना पोलिसांकडून अटक
नंदुरबार : महसूल, राज्य परिवहन महामंडळ व इतर शासकीय कार्यालयामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींसाठीच्या कागदपत्रांवर बनावट शिक्के मारून देत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहादा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तिघांकडून रबरी शिक्के तयार करून देण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
शहादा शहरात दिव्यांग बांधवांना महसूल, ग्रामविकास, परिवहन महामंडळांकडून देण्यात येणाऱ्या सवलतीच्या प्रमाणपत्रांवर बोगस शिक्के मारून देणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने शहरात तपास सुरू केल्यावर संदीप ऊर्फ संतोष गोरख पानपाटील (४८), महेंद्र सीताराम वाघ (४५) आणि सुनील चौधरी (४०, तिघे रा. शहादा) असे तिघेही बनावट शिक्के मारून देत असल्याचे समोर आले होते. यातून त्यांच्याविरोधात पोलिस कर्मचारी स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तिघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप आराक करत आहेत.