घरकुल गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 18:50 IST2023-04-06T18:50:34+5:302023-04-06T18:50:50+5:30
घरकुल गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

घरकुल गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
रमाकांत पाटील
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील मोगरा व भांग्रापाणी गावातील प्रधानमंत्री आवास योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. याबाबतचे पत्र ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे.
प्रधानमंत्री घरकुल योजनेत अक्कलकुवा तालुक्यातील मोगरा येथे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याने घरकुलाचा निधी परस्पर हडप केल्याचा आरोप आहे. गटविकास अधिकारी यांनी चौकशी करून त्याचा अहवाल प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील यांच्याकडे सादर केला. अहवालाच्या आधारे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दुर्गम भागातील लाभार्थींच्या जागेवरचा फोटो अपलोड करताना ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याने त्या लाभार्थीच्या घराऐवजी इतरत्र ठिकाणाहून फोटो अपलोड केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी, पिंपळखुटासह अनेक गावांतील प्रधान मंत्री आवास योजनेंतर्गतचे फोटो अपलोड करताना इतरत्र ठिकाणावरचेही फोटो अपलोड करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी होऊन अहवाल सादर करण्यात आला आहे.