खुर्चीमाळ येथे ७८ वर्षीय वृद्धावर अस्वलाचा हल्ला, वृद्ध गंभीर जखमी
By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: May 19, 2023 19:53 IST2023-05-19T19:52:44+5:302023-05-19T19:53:07+5:30
अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

खुर्चीमाळ येथे ७८ वर्षीय वृद्धावर अस्वलाचा हल्ला, वृद्ध गंभीर जखमी
मनोज शेलार, नंदुरबार: ७८ वर्षीय वृद्धावर अस्वलाने हल्ला केल्याने वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना खुर्चीमाळ, ता. अक्कलकुवा येथे घडली. वृद्धावर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
खुर्चीमाळ येथील कागड्या बारक्या नाईक (७८) हे शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मौलीपाडा जवळील वस्तीवरून उत्तरकार्यसाठी खुर्चीमाळ येथे जात होते. पाण्याची तहान लागल्याने सिंगपूरच्या डोंगर माथ्यावर असलेल्या झऱ्यावर पाणी पिण्यासाठी थांबले. त्याठिकाणी अचानक मागून आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. हात, कमरेचा भाग, डोके व चेहऱ्यावर ठिकठिकाणी अस्वलाने चावा घेतला. नाईक यांनी आपल्याजवळ असलेल्या लाकडी दांडक्याने अस्वलाला मारल्याने अस्वलाने तेथून पळ काढला. या रस्त्याने जाणाऱ्या काही जणांनी वृद्धाला तेथे जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.