नंदुरबार उप प्रादेशिक परिवहनाच्या वायुवेग पथकाचे उत्पन्न 4 कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 13:41 IST2023-04-18T13:40:57+5:302023-04-18T13:41:11+5:30

एकूण 14 हजार 837 नवीन वाहनांची नोंदणी

4 crores of revenue of Air Force Squad of Nandurbar Sub Regional Transport | नंदुरबार उप प्रादेशिक परिवहनाच्या वायुवेग पथकाचे उत्पन्न 4 कोटींवर

नंदुरबार उप प्रादेशिक परिवहनाच्या वायुवेग पथकाचे उत्पन्न 4 कोटींवर

रमाकांत पाटील/नंदुरबार : 2022-23 या आर्थिक वर्षात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मोटार वाहन कायद्यातील नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांकडून वायुवेग पथकाद्वारे 4 कोटी 4 लक्ष 63 हजार रक्कम वसुल  करण्यात आली आहे.

वायुवेग पथकामार्फत धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, ओव्हरलोड वाहतूक, हेल्मेटचा वापर न करणे इत्यादी विविध गुन्हे करणाऱ्या  5 हजार 683  वाहनांवर कारवाई करण्यात आली असून  उद्दीष्टाच्या तुलनेत ही रक्‍कम 192 टक्के आहे. नवीन वाहन नोंदणी, एक रकमी कर, मालवाहू वाहनांचा वाहन कर, परवाना शुल्क, अनुज्ञप्ती शुल्क इत्यांदीच्या माध्यमातून 56.17  कोटी जमा झाली आहे. तर सीमा तपासणी नाका, नवापूर येथे आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या 49 हजार 298  वाहनांकडून 14 कोटी 38 लक्ष रूपये तसेच सीमा तपासणी नाका, गवाली, ता. अक्कलकुवा येथे 23 हजार 151  वाहनांकडून 5 कोटी 40 लक्ष रूपये वाहन कर व दंड या स्वरूपात वसूल करण्यात आले आहे.

वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 14 हजार 837 नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली, यात 11 हजार 604 दुचाकी, 1 हजार 999  मोटार कार, 373 मालवाहक वाहने, 1 हजार 369  ट्रॅक्टर्स, 153 ट्रेलर्स आणि 144 जेसीबी क्रेन,अॅम्यूलन्स इत्यादी अन्य वाहनांचा समावेश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नवीन नोंदणीमध्ये 2 हजार 358 वाहनांची वाढ झाली आहे.

Web Title: 4 crores of revenue of Air Force Squad of Nandurbar Sub Regional Transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.