Maharashtra Election 2019 : Traditional competitive face-to-face in Kinwat | किनवटमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी आमने-सामने
किनवटमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी आमने-सामने

ठळक मुद्दे१५ उमेदवार रिंगणात वंचित बहुजन आघाडीची भूमिकाही महत्त्वपूर्ण

- गोकुळ भवरे

किनवट मतदारसंघात पुन्हा एकदा परंपरागत प्रतिस्पर्धी आमने-सामने आले आहेत. यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेही रिंगणात उतरले असून या चौरंगी लढतीत प्रदीप नाईक पुन्हा विजयाचा चौकार लगावणार की भीमराव केराम हे त्यांचा विजयरथ रोखतील, याकडे लक्ष लागले आहे.
किनवट मतदारसंघ प्रामुख्याने आदिवासी बंजारा बहुल आहे. माजी मंत्री डी.बी. पाटील यांचा अपवाद वगळता येथे आदिवासी आणि बंजारा समाजाने या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. गेल्या तीन निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने येथे विजय मिळवत या मतदारसंघाला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख मिळवून दिली आहे. प्रदीप नाईक यांनी मागील १५ वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामाच्या जोरावर पुन्हा रिंगणात उतरले आहेत. मितभाषी असलेले आ. नाईक हे बंजारासह इतर समाजातही संपर्क ठेवून आहेत.

दुसरीकडे माजी आ. भीमराव केराम हेही सहाव्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून केराम यांनी कडवी झुंज दिली होती. यावेळी भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. केराम यांच्यासाठी ही बाब जमेची ठरणार आहे. काँग्रेस, सेना, भाजपा, भारिप-बहुजन महासंघ अशा विविध पक्षांचा प्रवास करुन आलेल्या केरामांना मतदार कितपत स्वीकारतात? हेही आगामी काळात स्पष्ट होणार आहे. १९९३ च्या पोटनिवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाकडून केराम यांनी या मतदारसंघात विजय मिळवला होता. वंचित बहुजन आघाडीही रिंगणात उतरली असून डॉ. हमराज उईके यांना रिंगणात उतरविले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम करणारी उईके हे आपल्या विधानसभा मतदारसंघात कितपत प्रभाव पाडू शकतील, हेही तितकेच महत्वाचे आहे. मनसेचे उमेदवार विनोद राठोड यांच्यासह अपक्ष उमेदवार किती मतविभाजन करणार? यावरही मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
- पैनगंगा नदीवर प्रलंबित असलेल्या उनकेश्वर, मारेगाव, किनवट या उच्च पातळी बंधाऱ्याची मतदारसंघाला गरज आहे. सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी साठवण तलाव, पाझर तलावांची गरज आहे. या मतदारसंघात जवळपास २० प्रकल्प प्रलंबित आहेत. ते पूर्ण करणे गरजेचे आहे.
मतदारसंघातील रस्ते सिंचनाच्या कामाला युती सरकारच्या काळात ब्रेक बसल्याचा आरोप आहे. पुन्हा एकदा या कामांना मार्गी लावणे गरजेचे आहे. रस्ते, सिंचन, पाणी पुरवठा योजनांची कामे आवश्यक आहेत.
- किनवट मतदारसंघातील किनवट व माहूर तालुक्यातील १२९ गावचा पाणीपुरवठा, नळयोजनांची कामे मंजूर असली तरीही ही कामे प्रलंबितच आहेत. दुसरीकडे गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात ५० वरुन १०० खाटांची क्षमता करण्याची गरज आहे. त्याचवेळी जंगल क्षेत्राच्या संरक्षणासाठी किनवट येथे उपवनसंरक्षक कार्यालय गरजेचे आहे

प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची जमेची बाजू
प्रदीप नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)
- सलग तीन वेळा आमदार राहिलेले     प्रदीप नाईक हे संयमी मितभाषी म्हणून परिचित आहेत. 
- समाजकारण, राजकारण आणि विकास कामांचा दृढ संकल्प करणारे नेतृत्व
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत. शरद पवार यांचे कट्टर समर्थक

भीमराव केराम (भाजपा)
- आदिवासी मतदारसंघाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक कार्य व आंदोलनात सक्रिय
- भारिप-बहुजन महासंघ, काँग्रेस, शिवसेना, भाजप असा सर्वच राजकीय पक्षांचा प्रवास पूर्ण
- स्थानिकांशी दांडगा जनसंपर्क. तसेच सामान्यांशी जुळलेली नाळ 

डॉ. हेमराज उईके(वंचित आघाडी)
- पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात, यापूर्वी मांडवी गटातून जि.प. निवडणूक लढवण्याचा अनुभव
- लोकसभा निवडणुकीत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून कार्य केले
- बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव. सामान्य जनतेत चांगली प्रतिमा.

विनोद राठोड (मनसे)
- माजी खा. उत्तमराव राठोड यांच्या घराण्यातील सदस्य
- प्रत्यक्ष शेती करत राजकारणात सक्रिय. त्यातून सामान्य जनतेशी नाळ.
- तालुका खरेदी-विक्री संघ, ग्रा.पं., पं.स. निवडणुका लढविल्याने राजकीय अनुभव गाठीशी.

Web Title: Maharashtra Election 2019 : Traditional competitive face-to-face in Kinwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.