Maharashtra Election 2019 : 'Come to the village to vote'; candidates in Search of migrant voters | 'मतदानाला गावाकडे या'; उमेदवारांकडून स्थलांतरीत मतदारांचा शोध सुरू
'मतदानाला गावाकडे या'; उमेदवारांकडून स्थलांतरीत मतदारांचा शोध सुरू

ठळक मुद्देखरिप हंगाम संपताच हजारो कुटुंबांचे मतदारसंघातून स्थलांतरण रोजगारासाठी पुणे, मुंबई तसेच हैद्राबाद येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर बाहेरगावातील मतदारांना एकत्रित करुन आणण्याची व्यवस्थाही केली जात आहे.

- अनुराग पोवळे
 

नांदेड : एकीकडे रोजगाराचे प्रचारात आश्वासन  देत असलेल्या प्रमुख उमेदवारांकडून आता रोजगारासाठीच स्थलांतरीत झालेल्या मतदारांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे. या मतदारांना मतदानासाठी आणायचे नियोजनही केले जात आहे.

जिल्ह्यात असलेल्या नऊ मतदारसंघातील  सर्वाधिक स्थलांतर मुखेड, कंधार, लोहा, नायगांव या तालुक्यातून होत असल्याने या मतदारसंघात स्थलांतरीत  मतदारांचा शोध सुरू आहे.  नायगाव मतदारसंघातील नायगावसह सीमावर्ती भागातील उमरी आणि धर्माबाद तालुक्यातून रोजगारासाठी जवळच्या तेलंगणा राज्यात स्थलांतरीत होत आहेत. नायगाव मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या १ लाख ३६ हजार ४०८ इतकी आहे. या मतदारसंघातून स्थलांतरणाचे प्रमाण मोठे आहे. सर्वाधिक चिंताजनक परिस्थिती मुखेड मतदारसंघात आहे. या मतदारसंघात रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिंचनाची व्यवस्था नसल्याने खरिप हंगाम संपताच हजारो कुटुंब या मतदारसंघातून स्थलांतरण करीत असतात. याच मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कंधारच्या काही भागातूनही रोजगारासाठी पुणे, मुंबई तसेच हैद्राबाद येथे स्थलांतर होते. या मतदारसंघात १ लाख ३४ हजार १६९ मतदार आहेत. 

मुखेड मतदारसंघालगत असलेल्या लोहा मतदारसंघातही स्थलांतरणाचे प्रमाण मोठे आहे. डोंगराळ भाग, रोजगाराची कोणतेही साधन नसल्याने येथे कुटुंबासह आता युवकांनाही मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागत आहे. या मतदारसंघातून मोठ्या संख्येने रोजगारासाठी पुणे, मुंबईसह नाशिक आदी महानगरात स्थलांतर होत आहे. लोहा मतदारसंघात २ लाख ७३ हजार २२२ मतदार आहेत. या मतदारांना उमेदवार रोजगाराचे आश्वासन देत आहेत.  याच स्थलांतरीत मतदारांचा शोध प्रमुख उमेदवारांकडून घेतला जात आहे. मतदार यातील नावे शोधताना तो मतदार गावात नसल्याचे लक्षात येताच त्याचा ठाव ठिकाणा शोधला जात आहे. त्याच्याशी संपर्क करुन मतदानाच्या दिवशी गावाकडे ये, असा निरोप दिला जात आहे. इतकेच नव्हे तर बाहेरगावातील मतदारांना एकत्रित करुन त्यांना आता आणण्याची व्यवस्थाही केली जात आहे.  एकूणच स्थलांतरीत मतदारांची विनवणी आता उमेदवारांकडून सुरू आहे. 

जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योगधंदे नसल्याने स्थलांतरणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. आहे ते कारखानेही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात बंद पडलेल्या कारखान्यांचीही मोठी संख्या आहे. उस्मानशाही मील, टेक्सकॉम उद्योग, सुत गिरण्या बंद अवस्थेत असल्याने रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बहुतांश उमेदवारांनी रोजगाराचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन प्रचारात दिले आहे. दर निवडणुकीत असेच आश्वासने दिले जात असतात. जे की कधीही पूर्ण झाले नाहीत.

लोहा मतदारसंघाचा प्रचार पुण्यात
लोहा मतदारसंघातील अनेक युवक हे रोजगारासाठी पुण्यामध्ये स्थलांतरीत झाले आहेत. हीच बाब लक्षात घेवून मतदारसंघातील एका उमेदवाराने चक्क पुणे येथेच या स्थलांतरीत मतदारांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात पुन्हा एकदा मतदारसंघात रोजगार निर्मितीचे आश्वासन देण्यात आले. जिल्ह्यात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या ही ६३ हजार ५६२ इतकी आहे. विशेष म्हणजे यातील ७० टक्के मतदार हे सुशिक्षित असले तरीही इतर मतदार हे  या ना त्या कारणाने मतदारसंघाबाहेर स्थलांतरीत झाले आहे. त्यात रोजगाराचे मुख्य कारण आहे. स्थलांतरीत मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आता आवश्यक ती वाहन व्यवस्था उमेदवारांकडून केली जात आहे. मतदारांची संख्या पाहून वाहन निश्चित केले जात आहे. त्याचवेळी काही उमेदवार मतदारांना आपण स्वत:हून यावे. आल्यानंतर जो काही खर्च झाला तो दिला जाईल, असे आश्वासनही दिले जात आहे. 

Web Title: Maharashtra Election 2019 : 'Come to the village to vote'; candidates in Search of migrant voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.