Strong bandobast of police for immersion of Shri Ganesh | श्री गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त
श्री गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त

ठळक मुद्दे९ पोलीस उपायुक्तांसह २,३०० पोलीस नियुक्तबोट अन् वॉच टॉवरचीही व्यवस्थापोलीस आयुक्तांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री गणेश विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिसांनी तयारी केली आहे. ११ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विसर्जनाच्या मिरवणुकीचा बंदोबस्त १२ सेक्टरमध्ये विभाजित करण्यात आला असून, विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी ९ पोलीस उपायुक्तांसह २,३०० पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनात श्री गणेश विसर्जन बंदोबस्ताच्या उपाययोजना आणि तयारीचा आढावा घेण्यात आला. अतिरिक्त पोलीस आयुक्त बी. जी. गायकर तसेच डॉ. शशिकांत महावरकर यांच्या देखरेखीत ११ ते १५ सप्टेंबरपर्यंत विसर्जनाचा बंदोबस्त राहणार आहे.
विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान उपद्रवी मंडळी, समाजकंटक आणि गुन्हेगारांनी डोके वर काढू नये म्हणून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे यांच्या मार्गदर्शनात परिमंडळनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहेत. संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी घातपातविरोधी पथके नियमित तपासणी करणार आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कसलाही वादविवाद, गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व ठाणेदार त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, त्यांना खबरदारीच्या संबंधाने आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मिरवणुकीदरम्यान कोणत्याही मार्गावर अडसर निर्माण होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी नियोजन करून १२ ही सेक्टरमध्ये वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बॅण्ड-ढोलताशा पथकांमुळे ध्वनिप्रदूषण होणार नाही, यासंबंधानेही काळजी घेण्यात आली आहे.

विसर्जनाचे ठिकाण
फुटाळा तलाव, कोराडी तलाव, वेणा नदी, महादेव घाट, गांधीसागर तलाव, सक्करदरा तलाव अशा १० ठिकाणी अंदाजे ९८९ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे; शिवाय घरगुती गणेशमूर्तींचेही विसर्जन केले जाणार आहे. कृत्रिम तलावाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे. तलावांवर बोट आणि वॉच टॉवरचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
असा राहील पोलीस ताफा
पोलीस उपायुक्त : ०९
सहायक आयुक्त : १४
पोलीस निरीक्षक : ८७
पीएसआय ते एपीआय : १६४
पोलीस कर्मचारी : १६१४
महिला कर्मचारी : ३७०
होमगार्डस् : ३८७
महिला होमगार्डस् : १०५
बाहेरून बोलविलेले अधिकारी : २५
एसआरपीएफ कंपनी : ०१

सर्वाधिक बंदोबस्त फुटाळ्यावर
श्री गणेशमूर्तींचे सर्वाधिक विसर्जन फुटाळा तलावावर केले जाते. त्यामुळे येथे एकूण बंदोबस्तापैकी २ उपायुक्त, ३ सहायक आयुक्त, २३ पोलीस निरीक्षक, ४५ सहायक आणि उपनिरीक्षक, ३०० पोलीस कर्मचारी, ११५ महिला पोलीस, ५० पुरुष होमगार्ड आणि १६ महिला होमगार्ड तसेच एसआरपीएफची एक कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षात चार राखीव पथके, क्यूआरटी, एसआरपी, आरसीपीचीही पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. कुठे काही अनुचित प्रकार घडल्यास ही पथके तातडीने तेथे पोहचतील.


Web Title: Strong bandobast of police for immersion of Shri Ganesh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.