नासुप्रचा अर्थसंकल्प ३११ कोटींचा : विकास कामांवर होणार ३०८ कोटी खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 21:09 IST2020-02-26T21:07:38+5:302020-02-26T21:09:02+5:30
नागपूर सुधार प्रन्यासचा सन २०२०-२१ या अर्थिक वर्षाचा ३११.३० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. यात सुरुवातीची शिल्लक २.३६ कोटी रुपये, भांडवली जमा १९८.५७ कोटी, महसुली जमा ८०.६६ कोटी आणि अग्रीम व ठेवी जमा २९.७० कोटी रुपयांचा समावेश आहे.

नासुप्रचा अर्थसंकल्प ३११ कोटींचा : विकास कामांवर होणार ३०८ कोटी खर्च
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासचा सन २०२०-२१ या अर्थिक वर्षाचा ३११.३० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला. यात सुरुवातीची शिल्लक २.३६ कोटी रुपये, भांडवली जमा १९८.५७ कोटी, महसुली जमा ८०.६६ कोटी आणि अग्रीम व ठेवी जमा २९.७० कोटी रुपयांचा समावेश आहे.
नासुप्रची अर्थसंकल्पीय बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत नासुप्र सभापती शीतल तेली-उगले यांनी अर्थसंकल्प सादर केला. नासुप्रने सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात भांडवली खर्च १४७.०९ कोटी, महसुली खर्च १०६.७० कोटी आणि अग्रीम व ठेवी जमा ५४.६८ कोटी रुपये असे एकूण ३०८.४७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अर्थसंकल्प सादर करताना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, सहसंचालक, नगररचना नि. सी. आढारी, नासुप्रचे मुख्य अभियंता सुनील गुज्जेलवार, महाव्यवस्थापक राजेंद्र लांडे, कार्यकारी अधिकारी प्रशांत भांडारकर, नासुप्रचे मुख्यलेखा अधिकारी (वित्त) हेमंत ठाकरे, लेखाधिकारी यशवंत ढोरे, वरिष्ठ लेखा लिपिक राजेश काथवटे उपस्थित होते.
असा आहे २०२०-२१ चा अथर्संकल्प
- नासुप्र निधीतून घरबांधणी कार्यक्रमांतर्गत रु. ८० कोटी व भूखंड व दुकानांच्या भाडेपट्ट्याद्वारे प्रव्याजी १०० कोटी रुपये जमा अपेक्षित आहे.
- ५७२ व १९०० अभिन्यासामध्ये एकंदर २ कोटी रुपये प्राप्त होणे अपेक्षित असून या दोन्ही अभिन्यासामध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ३०.४५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
- नासुप्र निधीतून विकासाची विविध कामे व रस्त्यांचे डांबरीकरण या शीर्षांतर्गत १७ कोटी खर्च करण्याचे प्रावधान करण्यात आलेले आहे.
- उद्यान, विकास, वृक्षारोपण या शीर्षांतर्गत ४ कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले असून, विविध उद्यानांचे सौंदर्यीकरण, विकास आणि संगोपनाकरिता सदर निधी खर्ची करण्यात येणार आहे.
- शासननिर्णयानुसार सातव्या वेतनाचा लाभ सर्व कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक यांना देण्यात येत असल्याने आस्थापना खर्चामध्ये ८७ कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आलेले आहे.
- दलित वस्ती सुधार योजना आमदार निधी, खासदार निधी, मौजा मानेवाडा येथील ई-लायब्ररी, इस्लामिक कल्चरल सेंटरचे बांधकामाकरिता व इतर शासकीय निधीचे कामाकरिता ३६.६८ कोटींचे प्रावधान केलेले आहे.
१०० क्रीडांगणांचा विकास
- क्रीडांगणाचा विकास केंद्र सरकारच्या 'खेलो इंडिया' या अभियानाला पूरक म्हणून नागपूर शहरातील युवापिढीमध्ये खिलाडू वृत्तीचा विकास करण्याच्या दृष्टीने नागपूर शहरातील सुमारे १०० क्रीडांगणांचा दर्जा उंचाविण्याचे नासुप्रचे उद्दिष्ट आहे. त्या करिता ३३ कोटी रुपयांचे प्रावधान केलेले आहे.