गणेशोत्सवासाठी महावितरणने कंबर कसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 09:31 PM2019-08-28T21:31:44+5:302019-08-28T21:32:35+5:30

गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा यासाठी ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा म्हणून वीजवाहिन्या व वीज उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावयाच्या सूचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत.

Mahavitaran ready for Ganeshotsav | गणेशोत्सवासाठी महावितरणने कंबर कसली

गणेशोत्सवासाठी महावितरणने कंबर कसली

Next
ठळक मुद्दे देखभाल-दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाच्या आगमनाला काही दिवसच शिल्लक असून, येणारा गणेशोत्सव आनंददायी व निर्विघ्न पार पडावा यासाठी ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा म्हणून वीजवाहिन्या व वीज उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावयाच्या सूचना महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत.
वीजतारांच्या लगतच्या झाडांच्या फांद्या तोडणे, रोहित्रे, वितरण पेट्या यांची आवश्यक ती दुरुस्ती करणे, उपकेंद्रातील उपकरणांची तपासणी व दुरुस्ती करणे, नादुरुस्त असलेले किटकॅट बदलविणे, रहदारीच्या ठिकाणी लघुदाब व उच्चदाब वाहिन्यांचे गार्डिंग व्यवस्थित करून घेणे, योग्य क्षमतेचे वितळ तार (फ्यूज वायर) टाकणे, विभागीय, मंडळ आणि क्षेत्रीय स्तरावरील नियंत्रण कक्ष तिन्ही पाळ्यांत (२४ बाय ७) सुरू ठेवणे आदी कामे प्राधान्याने करण्याचे निर्देशही घुगल यांनी दिले आहेत.
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रति युनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हीलिंग) आकार असे वीजदर आहेत. सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात वीज वापरली तरीही शेवटच्या युनिटपर्यंत केवळ ४ रुपये ५५ पैसे प्रति युनिट एवढाच दर आकारण्यात येईल.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या दिवशी विसर्जन स्थळांवर मागणी करण्यात आलेला तात्पुरता वीजभार त्वरित देण्यात यावा, याशिवाय विसर्जनाच्या दिवशी वीजपुरवठा अखंडित राहील यासाठी विभागीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी व शाखा अधिकारी यांनी विसर्जन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वत: जातीने उपस्थित राहण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
संपूर्ण गणेशोत्सव काळात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी असणे बंधनकारक असून, सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुणीही मुख्यालय सोडू नये, गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक मार्गावरील उपरी वाहिन्यांचा मिरवणुकीतील मूर्ती किंवा देखावे यांना अडथळा होणार नाही याची अगोदरच सर्वेक्षण करून त्याअनुषंगाने तजबीज करावी, दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून जनमित्र पातळीपर्यंत याबाबत सर्वांना आवश्यक ते दिशानिर्देश देण्याचे आवाहनही दिलीप घुगल यांनी केले आहे.

 

 

Web Title: Mahavitaran ready for Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.