Maharashtra Assembly Election 2019 : पश्चिम नागपूर :घटलेल्या टक्केवारीत पश्चिमचे गणित : मतदान ४९.६०%

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 03:28 AM2019-10-22T03:28:24+5:302019-10-22T03:29:02+5:30

पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात प्रत्यक्षात ४९.६० टक्केच मतदान झाले. २०१४ च्या तुलनेत २.५४ टक्क्यांची घट झाली.

Maharashtra Assembly Election 2019: West Nagpur: West's 'math' in declining percentage: voting 49.60% | Maharashtra Assembly Election 2019 : पश्चिम नागपूर :घटलेल्या टक्केवारीत पश्चिमचे गणित : मतदान ४९.६०%

Maharashtra Assembly Election 2019 : पश्चिम नागपूर :घटलेल्या टक्केवारीत पश्चिमचे गणित : मतदान ४९.६०%

Next
ठळक मुद्देमतदान शांततेत : सकाळच्या दोन तासात दिसला निरुत्साह, सुशिक्षितांनी दाखविली पाठ

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात सर्वसमावेशक मतदारांचा समावेश आहे. सिव्हिल लाईन्स, धरमपेठ, रामनगर, फ्रेंडस् कॉलनीसारख्या पॉश वस्त्या बरोबरच येथे गिट्टीखदान, गंगानगर, जगदीशनगर, मकरधोकडा, जाफरनगर, मानकापूर या भागातील मतदार सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बलही आहेत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी किमान ६० वर जाईल, अशी अपेक्षा होती. मतदानाच्या दिवशी वातावरणही तसेच होते. मात्र प्रत्यक्षात ४९.६० टक्केच मतदान झाले. २०१४ च्या तुलनेत २.५४ टक्क्यांची घट झाली. पहिल्या दोन तासात या मतदार संघात ७.४९ टक्के मतदान झाले. पुढे ११ पर्यंत १० टक्क्यांची वाढ दिसून आली. ११ ते १ च्या दरम्यान केवळ ६ टक्के मतदान झाले. मात्र १ ते ३ च्या दरम्यान १० टक्के मतदान झाले. ३ ते ५ च्या दरम्यान फक्त ५ टक्क्यांनी मतदान वाढले. काही मतदान केंद्रावर ५ नंतरही मतदार दिसून आले. पण एकंदरीतच पश्चिम नागपूर विधानसभेत अपेक्षित असलेली मतदानाची टक्केवारी शक्य होऊ शकली नाही. कमी झालेल्या टक्केवारीचा फटका कुणाला बसणार, हे मतमोजणीच्या दिवशीच कळणार आहे.
ईव्हीएममध्ये बिघाड, मतदारांची रांग
पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात किमान सात मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या. यात बहुतांश घटना मतदानाला सुरुवात होतानाच घडल्या. त्यामुळे मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. मतदारांना तास तासभर ताटकळत उभे राहावे लागले. दाभा येथील जयस्वाल हायस्कूलमध्ये बूथ क्रमांक २११ मधील ईव्हीएम सुरूच झाली नव्हती. किमान तासभर मतदारांना ताटकळत बसावे लागले, असे स्थानिक पक्षाच्या प्रतिनिधींचा आरोप होता. स्थानिक प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्याने मतदानाचा वेळ वाढवून देण्यात आल्याचे सांगितले. येथील ईव्हीएम बदलवून देण्यात आली. त्याचबरोबर मनपा शाळा दाभा येथे सकाळी ८ वाजताच्या सुमारास ईव्हीएम बंद पडली. अवघ्या अर्धा तासातच ईव्हीएम बदलवून देण्यात आली. डागा ले-आऊट येथील सरस्वती प्रा. शाळा येथील बूथ क्रमांक १० ची मशीन बंद पडली. लगेच ईव्हीएम बदलविण्यात आल्याची माहिती आहे. तसेच येथील बूथ क्रमांक ९ ची मशीन २.४५ वाजता बंद पडली. ३.५० वाजता सुरू झाली. तसेच बूथ ८ मध्ये ४ वाजता बंद पडली १५ मिनिटात सुरू झाली. गोरेवाडा रोड बोरगाव येथील गुलाम नबी आझाद शाळेतील बूथवर ९.१५ वाजता ते १०.१० वाजताच्या दरम्यान ईव्हीएम बंद होती. सुरेंद्रगड हिंदी उच्च प्राथमिक शाळा येथील बूथ क्रमांक २ वर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नवीन ईव्हीएम लावावी लागली. येथेही अर्धा तास मतदान खोळंबले होते. गोरेवाडा येथील आदिवासी अकादमी उच्च माध्यमिक शाळा येथील बूथ क्रमांक ४ वर २० मिनिट मशीन बंद होती. तसेच बोरगाव येथील सेंट मार्टिन स्कूलमध्ये ईव्हीएम बंद पडल्याने दोन तास मतदार मतदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे स्थानिक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी सांगितले. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे १८ तक्रारी ईव्हीएम व व्हीहीपॅट बंद पडल्याच्या आल्या. आलेल्या सर्व ठिकाणची ईव्हीएम बदलविण्यात आली. एक अर्धा तासाचा कालावधी यात गेला. कुठल्याही मतदान केंद्रावर वेळ वाढवून देण्यात आला नाही. फक्त ६ वाजताच्या आत मतदान केंद्राच्या परिसरात जेवढे मतदार होते, त्यांना मतदान करू देण्यात आले.
मतदार यादीतील घोळ कायम
पश्चिम नागपुरातील अनेक मतदान केंद्रात मतदार यादीत घोळ असल्याचे दिसून आले. अनेकांची नावे मतदार यादीत नव्हते, काहींची नावे दुसऱ्या ठिकाणी होते, काहींचे नावे वेगळे व फोटो वेगळे होते, पती-पत्नीची नावे वेगवेगळ्या मतदार यादीत होते. मतदार यादीतील घोळ कायमच राहिल्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचितच राहिले. गिट्टीखदान येथील विनोद नाडे या व्यक्तीचे नाव लोकप्रिय विद्यालयातील बूथच्या मतदार यादीत होते तर परिवारातील अन्य सदस्यांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी असल्याचे दिसून आले. नवीन व जुन्या मतदान ओळखपत्रामुळेही अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. नवीन कार्ड असलेल्या मतदारांचे नाव यादीत होते, तर जुने कार्ड असलेल्या व्यक्तीचे नावच यादी शोधूनही सापडत नव्हते. याच परिसरात हसन खान यांचे नाव मतदार यादीत हसन पठाण असे असल्यामुळे त्यांना मतदान अधिकाऱ्यांनी मतदानापासून मज्जाव केला होता. परंतु त्यांच्याकडील कागदपत्र बघून त्यांना मतदान करण्याची परवानगी दिली. रियाज अली व नियाज अली हे दोन बंधू आहेत. परंतु, मतदार यादीत त्यांना वडील-मुलगा असे दर्शविण्यात आले. हजारीपहाड परिसरातील मनपा मकरधोकडा हिंदी प्राथमिक शाळा व जगदीशनगर येथील पंडित नेहरू हायस्कूल या मतदान केंद्रावरील मतदार यादीत अनेकांचे नावच नव्हते, तर काहींची नावे अन्य ठिकाणी होते. काहीचे नाव वेगळे व फोटो वेगळ्याच व्यक्तीचे असेही दिसून आले. माजी महापौर माया इवनाते यांचे नाव वेगळ्या तर कुटुंबातील इतर सदस्यांची नावे वेगळ्या यादीत होती. एका ५५ वर्षांच्या महिलेचे वय मतदार यादीत ३ वर्ष होते. गंगानगर येथील राजेश नाईक यांनी मतदान केले. परंतु, त्यांची पत्नी वेनंता नाईकचे नावच यादीत नव्हते. हयात असलेल्या अनेक मतदारांची नावे यादीत दिसत नसताना नामदेव चौधरी व खुशालसिंग बिष्ट यांचे निधन होऊन त्यांची
नावे यादीत कायमच होती. गिट्टीखदान येथील पार्वती नायडू मृत असून, त्यांचे नाव मतदार यादीत होते, परंतु त्यांची मुलगी उषा मेघनाथ नयडू जिवंत असूनही त्यांचे नाव मतदार नव्हते. दाभा परिसरातील अनेक मतदारांची नावे दाभा परिसरातील मतदान केंद्रावर नव्हे तर अन्य ठिकाणच्या मतदान केंद्रावर होती.

४एकूण मतदार ३६२२७४
४पुरुष १८२९०६
४महिला १७९३६३
४मतदान केंद्र ३३२

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: West Nagpur: West's 'math' in declining percentage: voting 49.60%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.