Maharashtra Assembly Election 2019 : South-West Nagpur: Decrease in 'hyprofile' constituency: voting 50.37% | Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण- पश्चिम नागपूर  : ‘हायप्रोफाईल’ मतदारसंघातच घट : मतदान ५०.३७%

Maharashtra Assembly Election 2019 : दक्षिण- पश्चिम नागपूर  : ‘हायप्रोफाईल’ मतदारसंघातच घट : मतदान ५०.३७%

ठळक मुद्दे२०१४ च्या तुलनेत ६ टक्के कमी मतदान : तुरळक अपवाद वगळता मतदान शांततेत

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघात सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाल्यापासून मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली. पावसाचे सावट असल्याने अनेक मतदार सकाळीच मतदानासाठी घराबाहेर पडले. परंतु २०१४ च्या तुलनेत मतदानाचा निरुत्साह दिसून आला व ५.८० टक्क्यांनी मतदान घटले. काही तुरळक ठिकाणी वगळता दक्षिण-पश्चिम मतदार संघात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. काही मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’ काही वेळासाठी बंद पडल्या होत्या, तर काही मतदारांची नावे मतदार यादीत नव्हती. परंतु किरकोळ अपवाद वगळता मतदानाच्या प्रक्रियेत घोळ दिसून आला नाही. मतदार संघातील रामदासपेठ, प्रतापनगर, त्रिमूर्तीनगर, विवेकानंदनगर या परिसरातील मतदारांनी दुपारी २ वाजेनंतर मतदानासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
गिरीजाबाईंनी दाखविली जिद्द


शिवणगावमध्ये राहणाऱ्या गिरीजाबाई नेवारे (६५) या ज्येष्ठ नागरिक महिला मतदानासाठी आल्या होत्या. त्यांना पायाचे दुखणे असल्याने चालतादेखील येत नव्हते. तरीदेखील त्या जिद्दीने मतदान करायला आल्या. त्यांना ‘व्हीलचेअर’वरून मतदानासाठी नेण्यात आले. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्यच आहे. मतदानातूनच परिसाराचा विकास होईल. त्यामुळे आजारी असो की कुठेही असो आपण मतदानाचा हक्क नेहमीच बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. मागील अनेक वर्षांपासून सातत्याने त्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत आहेत.
प्रतापनगरात पडले ‘टेंडर व्होट’
प्रतापनगर माध्यमिक शाळेतील मतदान केंद्रात प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती. तरीदेखील तेथे एक ‘टेंडर व्होट’ पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. नजरचुकीमुळे एका मतदाराच्या नावावर भलत्याच मतदाराचे मतदान झाले. अखेर नवीन मतदाराला ‘टेंडर व्होट’ची संधी देण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाºयांना डोळ्यात तेल लावून चाचपणी करण्याची सूचना दिली.
खासदार आले सायकलने
खा. विकास महात्मे यांनी सायकलवर येऊन मतदानाचे कर्तव्य बजावले. आपल्या घरापासून ते विवेकानंदनगर महानगरपालिका शाळेच्या मतदान केंद्रापर्यंत ते सायकलने आले. सामान्यांसमवेत ते रांगेत उभे राहिले व त्यानंतर अर्ध्या तासाने मतदान केले. यावेळी त्यांचे कुटुंबीयदेखील सोबत होते.
‘ईव्हीएम’मुळे मनस्ताप
सकाळी ७ ला मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर सेंट अँथोनी हायस्कूल व मॉडर्न स्कूल (नीरी) येथील मतदान केंद्रांवरील ‘ईव्हीएम’ काही काळासाठी बंद पडली होती. स्कूल ऑफ स्कॉलर्स येथील मतदान केंद्रावरील ‘ईव्हीएम’ला थोडा वेळ तांत्रिक समस्या आली होती. यावेळी या मतदान कक्षात मतदारांची बऱ्यापैकी रांग लागली होती.
‘रॅम्प’मुळे गोंधळ
दक्षिण-पश्चिम नागपुरातील बहुतांश मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी ‘रॅम्प’ची व्यवस्था होती. मात्र काही मतदान केंद्रांवर हवी तशी सुविधा करण्यात आली नव्हती. त्रिमूर्तीनगर परिसरातील यशोदा शाळेतील मतदान केंद्रावर ‘रॅम्प’ नसल्यामुळे दिव्यांग मतदारांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तेथे व्यवस्था करण्यात आली. बहुतांश मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी ‘व्हीलचेअर’ची व्यवस्था होती. शिवणगावात तर सुरक्षा कर्मचाºयांनीदेखील दिव्यांगांना ‘रॅम्प’वर नेण्यात मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र होते.
कुलगुरूंच्या पत्नीचे नावच नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापाठीचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नागपुरात येऊन मतदान केले. मॉडर्न स्कूल, (नीरी) येथे त्यांनी मतदानाचे कर्तव्य बजावले. त्यांच्या पत्नी ज्योती येवले यांचे मात्र मतदारयादीत नावच नव्हते. असा प्रकार इतरही काही मतदारांच्या बाबतीत घडल्याचे दिसून आले. अजनीतील एकाच कुटुंबातील काही व्यक्तींची नावे मतदारयादीत नव्हती. त्यामुळे मतदान न करताच त्यांना घराकडे परतावे लागले.
शिवणगावात मतदारांमध्ये उत्साह
मिहान प्रकल्पामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या शिवणगावमध्ये मतदानाप्रति गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. तरुण, ज्येष्ठ, वृद्ध आणि अपंग मतदारांनी दिवसभर मतदानासाठी रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावला.
‘व्हीव्हीपॅट’संदर्भात तक्रार
माऊंट कार्मेल कॉन्व्हेंटमधील मतदार केंद्रावर ‘व्हीव्हीपॅट मशीन’ योग्य पद्धतीने काम करीत ़नसल्याची तक्रार मतदारांनी केली. केतकी अरबट यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनाच पत्र लिहिले. मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी प्रत्येकाचे मतदान पाहत होते. मी मतदान करायला गेले तेव्हा ‘ईव्हीएम’चा लाल दिवा सुरूच होता. बटन दाबल्यानंतर ‘बीप’चा आवाज आलाच नाही. शिवाय ‘व्हीव्हीपॅट’वर मला मत दिलेल्या उमेदवाराची चिठ्ठीदेखील दिसली नाही. मी याबाबत विचारणा केली असता, मला इतर मतदारांचे मतदान पाहण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र ते नियमांना धरून नव्हते, असे केतकी अरबट हिने पत्रात लिहिले आहे.

‘पॉश’ वस्त्यात सकाळीच मतदान
रामदासपेठ, साई मंदिर, रहाटे कॉलनी, खामला, प्रतापनगर, अंबाझरी, दीक्षाभूमी, त्रिमूर्तीनगर आदी ‘पॉश’ वस्त्यात सकाळीच नागरिक मतदानासाठी घराबाहेर पडले. मतदानासाठी सुटी असल्यामुळे अनेकांनी दिवाळीच्या शॉपिंगचे नियोजन केले होते. सायंकाळी ५ नंतर बऱ्याच मतदान केंद्रांवर परत गर्दी दिसून आली.
सखी मतदार केंद्रावर गुलाबपुष्पांनी स्वागत
दक्षिण-पश्चिम नागपुरातील सखी मतदार केंद्र प्रतापनगर माध्यमिक शाळेत स्थापन करण्यात आले होते. या मतदार केंद्राच्या संबंधित पोलिंग बूथमध्ये सर्व व्यवस्था महिला अधिकारी व कर्मचारीच सांभाळत होत्या. सकाळच्या सुमारास तेथे येणाºया मतदारांचे गुलाबपुष्पांनी स्वागत करण्यात आले. या पोलिंग बूथची फुगे लावून सजावटदेखील करण्यात आली होती. परंतु इतर सखी मतदार केंद्रांप्रमाणे येथे ‘सेल्फी पॉईंट’ देण्यात आला नव्हता. यामुळे काही मतदारांनी हिरमोड झाल्याची भावना व्यक्त केली.

‘मतदान हे राष्ट्रीय कर्तव्यच’
धरमपेठ येथील निवासी व ‘बीसीए’ची विद्यार्थिनी ऐश्वर्या हरकरे हिचे पहिलेच मतदान होते. नवमतदार असल्याने ती सकाळीच उत्साहाने मतदानाला आली होती. ‘ईव्हीएम’ची बटन दाबली आणि एक मोठी जबाबदारी पार पाडल्याची जाणीव झाली. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्यच आहे व प्रत्येक तरुण-तरुणीने ते पार पाडायलाच हवे, अशी भावना तिने व्यक्त केली.

दक्षिण पश्चिम नागपूर
४एकूण मतदार ३,८४,०९४
४पुरुष १,९२,२७३
४महिला १,९१,८०८
४मतदान केंद्र ३७२

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : South-West Nagpur: Decrease in 'hyprofile' constituency: voting 50.37%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.