Maharashtra Assembly Election 2019 : निकालाच्या दिवशी मतपेटीतून कमळच फुलणार : मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 08:27 PM2019-10-19T20:27:10+5:302019-10-19T20:31:58+5:30

निकालांत मतपेटीतून कमळच फुलणार असून महायुतीला राज्यात दोन तृतीयांशहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Maharashtra Assembly Election 2019: Lotus will be bloom from ballot on the day of the results: CM expresses confidence | Maharashtra Assembly Election 2019 : निकालाच्या दिवशी मतपेटीतून कमळच फुलणार : मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Assembly Election 2019 : निकालाच्या दिवशी मतपेटीतून कमळच फुलणार : मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Next
ठळक मुद्देदक्षिण-पश्चिम नागपुरातील ‘रोड शो’मध्ये उसळला जनसागर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील पाच वर्षे आम्ही पारदर्शक पद्धतीने काम केले व राज्याला विकासाच्या मार्गावर नेले. २१ तारखेचा दिवस हा कार्यकर्त्यांसाठी लोकशाहीच्या युद्धाचा दिवस आहे. कार्यकर्त्यांनी या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान कसे होईल याकडे लक्ष द्यायचे आहे. निकालांत मतपेटीतून कमळच फुलणार असून महायुतीला राज्यात दोन तृतीयांशहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेल्या फडणवीस यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सकाळी ‘रोड शो’ केला. यावेळी ते बोलत होते.


सकाळी १० च्या सुमारास गोपालनगर येथील माटे चौकातून ‘रोड शो’ला सुरुवात झाली. यावेळी सर्वात अगोदर मुख्यमंत्र्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला माल्यार्पण केले व त्यानंतर ‘रोड शो’ची सुरुवात झाली. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजपाचे पूर्व विदर्भ प्रचारप्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, खा.अजय संचेती, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, महापौर नंदा जिचकार, भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. गोपालनगर बाजार, पडोळे चौक, स्वावलंबीनगर या मार्गाने ‘रोड शो’ काढण्यात आला व स्वावलंबीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याजवळ याचे समापन झाले. समापनप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ््याला माल्यार्पण केले. यानंतर त्यांनी छोटेखानी भाषण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच कौल द्यायचा असं महाराष्ट्रानं ठरवलं आहे. भाजप-शिवसेना-रिपाइं, रासप आणि अन्य घटकपक्षांच्या महायुतीला प्रचंड मताधिक्य मिळेल व हा एक नवा विक्रम असेल. आम्ही प्रत्येक समाजाचं चित्र बदलायचं काम केलंय. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाचे चित्र बदललं आहे. आता पुन्हा जनतेसमोर चाललो आहे. जनतेचं इतकं प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद अभूतपूर्व विजय मिळवून देणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २४ तारखेला निकालानंतर जल्लोषासाठी मी येथेच परत येईल, असेदेखील ते म्हणाले.

रस्त्यांवर रांगोळ्या, जागोजागी स्वागत
दरम्यान, ‘रोड शो’ दरम्यान मार्गावर कार्यकर्त्यांसमवेत नागरिकांनीदेखील रांगोळ्या काढल्या होत्या. जागोजागी नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. काही ठिकाणी तर महिलांनी त्यांना ओवाळलेदेखील. आजूबाजूच्या घरांच्या गॅलरी, गच्ची येथे नागरिक मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी एकत्रित आले होते. अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर पुष्पवर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले. ‘रोड शो’ची लांबीच सुमारे एक ते दीड किलोमीटरची होती व दहा हजारांहून अधिक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

कडेकोट सुरक्षाव्यवस्था
मुख्यमंत्र्यांसोबत या ‘रोड शो’मध्ये प्रचंड गर्दी होती व त्यादृष्टीने कडेकोट सुरक्षा व्यवस्थादेखील तैनात करण्यात आली होती. याशिवाय वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी अगोदरच वाहतूक काही काळासाठी वळविली होती. रिंग रोडवर तर वाहनचालकांना त्रास होऊ नये यासाठी त्या पट्ट्यातून ‘रोड शो’ला वेगाने समोर घेण्यात आले.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Lotus will be bloom from ballot on the day of the results: CM expresses confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.