Maharashtra Assembly Election 2019: Ground Report: In Nagpur Central has increased fight in campaign | Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर 'मध्य'मध्ये प्रचारात वाढली चुरस

Maharashtra Assembly Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट : नागपूर 'मध्य'मध्ये प्रचारात वाढली चुरस

ठळक मुद्देभाजप-काँग्रेसकडून तरुणाईवर भर : वंचित बहुजन आघाडी, बसपदेखील प्रचारात प्रभावी : जातीय समीकरणांवर सर्वांचे गणित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानण्यात येणाऱ्या मध्य नागपूरची जागा आता भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या मतदारसंघातून कुंभारे यांची ‘हॅट्ट्रिक’ करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. तर काँग्रेसने बंटी शेळके यांना उमेदवारी देऊन तरुणाईला साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. प्रचार अखेरच्या टप्प्याकडे आला असताना येथे प्रचाराची रंगत वाढली असून, जातीय समीकरणांचे गणित जमविण्यासाठी उमेदवार व पक्षांचा भर दिसून येत आहे.
संघाचा बालेकिल्ला व मुस्लीम तसेच हलबा मतदारांचे प्राबल्य, अशी या मतदारसंघाची ओळख आहे. जातीय समीकरणांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात मागील दोन ‘टर्म’पासून भाजपाचे विकास कुंभारे हे काँग्रेस उमेदवारावर वरचढ ठरले आहेत. परंतु यंदा कुंभारे यांच्यासमोर आव्हाने आहेत. शहराध्यक्ष प्रवीण दटके हेदेखील येथून तिकिटासाठी इच्छुक होते. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने काही कार्यकर्त्यांनी उघडपणे कुंभारे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर पक्षाला तातडीने ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यात यश आले. मतदानाच्या वेळी हे नाराज प्रत्यक्षात कुंभारे यांना किती प्रमाणात मते देतात, यावर बरेच काही निर्भर आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मध्य नागपुरातून अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये मताधिक्याचा आकडा २३ हजारांनी घटला. त्यामुळे पक्षाने ही बाब गंभीरतेने घेतली व मागील काही महिन्यांत येथे पक्ष बळकटीवर जोर देण्यात आला आहे. प्रत्यक्ष प्रचारादरम्यान गृहसंपर्कावर जास्त भर देण्यात येत असल्याचे चित्र आहे. शहराध्यक्ष दटके यांनी कुंभारे यांच्या विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावली असल्याने, त्यांची स्थिती आता पूर्वीपेक्षा बरीच मजबूत झाली आहे.
दुसरीकडे काँग्रेसने अखेरच्या क्षणी बंटी शेळके यांना उमेदवारी दिली. मागील पाच वर्षांत शेळके यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून मध्य नागपुरात विविध आंदोलने केली व त्यामुळे ते चर्चेत राहिले. परंतु पक्षांतर्गत असलेली काही नेत्यांची नाराजी व जातीय समीकरणांचे गणित बसविणे हे मोठे आव्हान शेळके यांच्यासमोर आहे. शेळके यांचा गृहसंपर्कातून मतदारांपर्यंत जाण्याकडेच त्यांचा जास्त कल आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून कमलेश भगतकर यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. हलबा मते आपल्या पारड्याच यावीत, यासाठी भगतकर हे विशेष प्रयत्नरत आहेत. यामुळे मतदारसंघात त्यांचे मोठे आव्हान मानण्यात येत आहे. बसपाकडून धर्मेंद्र मंडलिक हे उमेदवार आहेत. २००९ साली बसपच्या उमेदवाराने २३ हजारांहून अधिक मते घेत चांगलीच टक्कर दिली होती. मंडलिक यांचा प्रचारदेखील जोरात सुरू आहे. मतदारसंघातून केवळ दोनच मुस्लीम उमेदवार उभे असून, त्यात ‘एमआयएम’चे अब्दुल शारिक यांचादेखील समावेश आहे. पक्षाचे अध्यक्ष असऊद्दीन ओवैसी यांनी जाहीर सभा घेऊन मुस्लिमांची मते वळविण्याचा प्रयत्न केला आहे. याचा काँग्रेसला फटका बसू शकतो. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वांनीच कंबर कसली आहे. त्यामुळे आता कुणाचा प्रचार बाजी मारणार, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकूण उमेदवार : १३
एकूण मतदार : ३,२४,१५८

 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Ground Report: In Nagpur Central has increased fight in campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.