Maharashtra Assembly Election 2019 : मध्य नागपूर :  ‘मध्य’ साधणार कोण? मतदान ५०.८८ %

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 02:24 AM2019-10-22T02:24:22+5:302019-10-22T02:25:47+5:30

मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात काही तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. प्रथमच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या युवकात उत्सुकता व उत्साह दिसून आला. वयोवृद्ध, अंध व दिव्यांग मतदारांनीही मतदानाचा अधिकार बजावला.

Maharashtra Assembly Election 2019: Central Nagpur: Who will be the 'Central'? Voting 50.88% | Maharashtra Assembly Election 2019 : मध्य नागपूर :  ‘मध्य’ साधणार कोण? मतदान ५०.८८ %

Maharashtra Assembly Election 2019 : मध्य नागपूर :  ‘मध्य’ साधणार कोण? मतदान ५०.८८ %

Next


लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, सरसंघचालक मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचे वास्तव्य आहे. या क्षेत्रात काही तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. प्रथमच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या युवकात उत्सुकता व उत्साह दिसून आला. वयोवृद्ध, अंध व दिव्यांग मतदारांनीही मतदानाचा अधिकार बजावला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी कुटुंबीयासह सकाळी ८.४० वाजता महापालिकेच्या महाल येथील टाऊ न हॉल कार्यालयातील मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला. त्यांची पत्नी कांचन गडकरी यांच्यासह मुले निखिल व सारंग यांनी सपत्नीक मतदान केले. तर आ. विकास कुंभारे यांनी टिमकी येथील केंद्रावर सपत्नीक मतदान केले. काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी महाल येथील टाऊ न हॉल कार्यालयातील मतदान केंद्रावर सपत्नीक मतदान केले. नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आणि नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन केले.
मध्य नागपूर मतदार संघात शांततामय वातावरणात निवडणूक पार पडली. सकाळपासून अत्यंत संथपणे येणारा मतदार सकाळी १० नंतर लगबगीने मतदानासाठी येऊ लागला. सकाळपासूनच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, महिलांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. महिला मतदारांमध्ये उत्साह होता. घरच्या वयस्क मंडळींना युवकांनी मतदार केंद्रावर आणले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सकाळी ७ वाजता आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी सकाळी ९.३० वाजता संंघ मुख्यालयानजीकच्या भाऊजी दप्तरी प्राथमिक शाळेतील केंद्रावर मतदान केले. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनपा टाऊन हॉल कार्यालयातील मतदान केंद्रावर सकाळी ८.४० वाजता आणि आमदार विकास कुंभारे यांनी टिमकी येथील हंसापुरी हिंदी उच्च प्राथमिक शाळेतील केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला.
लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता विधानसभा निवडणुकीत मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासाठी मतदान केंद्राबाहेर विशेष पोडियमची व्यवस्था केली होती. अशीच व्यवस्था महाल येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठीही करण्यात आली. त्यामुळे कुठलाही गोंधळ झाला नाही.
मध्य नागपुरातील बहुतांश मतदार केंद्रापासून १०० मीटर लांब भाजपच्या बूथवर लॅपटॉपचा वापर करून मतदारांना नावाच्या स्लीप दिल्या जात होत्या. बूथ मॅनेजमेंटसाठी हायटेक यंत्रणेचा वापर होताना दिसून आला. नावाच्या स्लीपसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदारांनी बूथवर गर्दी केली होती. सर्वच मतदान केंद्रांवर सुरुवातीला दोन तास संथ मतदान झाले. सकाळी १० वाजताच्या सुमारास मतदारांची गर्दी दिसून आली. दुपारी १२ ते दुपारी ३ च्या सुमारास मतदारांची संख्या रोडावली. त्यानंतर मतदारांमध्ये पुन्हा उत्साह संचारल्याचे दिसून आले. मोमीनपुरा परिसरातील केंद्रात युवतींचा समूह मतदान केल्यानंतर एकमेकींना मतदान केल्याचे चिन्ह असलेली शाई दाखवून समाधान व्यक्त करीत होत्या.
जुनी मंगळवारी येथील उषाबेन चंद्रकांत ठाकर वूमेन्स कॉलेज केंदावर दिव्यांग मतदार अर्चना भांदककर या महिलेने आईच्या मदतीने मतदानाचा हक्क बजावला. लालगंज येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल केंद्रावर लालगंज येथील सीताराम कोल्हाटकर या दिव्यांगाने मतदान केले. मोमीनपुरा येथील उर्दू अप्पर प्रायमरी शाळेत मतदारांना मशीनवरील नावे स्पष्टपणे दिसत नसल्याची तक्रार मतदारांनी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी खोलीत लाईटची व्यवस्था करून मतदारांचे समाधान केले.
विविध व्यापारी संघटनांनी १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार व्यापाऱ्यांनी इतवारी, मस्कासाथ, शहीद चौक या भागातील बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. ही प्रथा अनेक निवडणुकांमध्ये पाळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
मोमीनपुऱ्यातील केंद्रावर गर्दी


सुरुवातीला दोन तास मतदान संथ होते. सकाळी १० नंतर मोमीनपुरा भागातील मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक केंद्रावर दुपारपर्यंत गर्दी कायम होती.
कार्यकर्त्यांत उत्साह
मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षाच्या बूथवरील कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह होता. मतदारांना मतदार यादीतील नाव शोधून देण्यापासून कोणत्या बूथवर मतदान करायचे, याची माहिती ते देत होते. मतदारांची नावे शोधण्यासाठी काही बूथवरील कार्यकर्त्यांना यासाठी लॅपटॉप देण्यात आले होते.
अनेकांची नावे गायब
मतदार ओळखपत्र आहे, परंतु मतदार यादीत नाव नसल्याने मतदान केंद्रावर आलेल्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. लोकसभा निवडणुकीत हंसापुरी हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या केंद्रावर मतदान केलेल्या सोनू नैकेले आणि सुभाष हसोरिया यांना विधानसभा निवडणुकीत मतदानापासून वंचित राहावे लागले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
सर्वच मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्यांच्या मदतीला मध्य प्रदेशातील राज्य सुरक्षा दलाचे पोलीस आणि होमगार्ड तैनात होते. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
मतदानासाठी ओडिशा ते नागपूर
मोमीनपुरा येथील रहिवासी अब्दुल नासीर हे केवळ मतदानासाठी ओडिशा येथून नागुपरात आले. रेल्वेचे तिकीट वेटिंगवर असताना त्यांनी ५०० रुपये जादा खर्च करून प्रवास केला. मतदान राष्ट्रीय कर्तव्य असून ते सर्वांनी बजावावे, असे त्यांनी सांगितले.
तीन मशीन बंद तर १२ व्हीव्हीपॅट बदलले
टिमकी नालसाब चौकातील जामिया अरबिया केंद्रात दुपारी ३ वाजता मशीन बंद पडली, तर ३.३० वाजता दुरुस्त करून सुरू करण्यात आली. मोमीनपुरा येथील अन्सार कम्युनिटी हॉलमध्ये सकाळी १०.१५ वाजता मशीन बंद झाली, तर १०.४५ वाजता सुरू झाली. यंग मुस्लीम फुटबॉल मैदानाच्या हॉलमध्ये सकाळी २० मिनिटे मशीन बंद पडली. शिवाय १२ व्हीव्हीपॅट बदलविण्यात आले.
बूथ परिसरात अधिकाऱ्यांतर्फे मार्गदर्शन
मतदान केंद्रात येणाऱ्या मतदारांना बूथ परिसरात आयोगाने नियुक्त केलेले अधिकारी मतदारांना मार्गदर्शन करीत होते. अशी व्यवस्था सर्व केंद्रांवर दिसून आली. त्यामुळे मतदारांना इतरत्र भटकावे लागले नाही.
पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांमध्ये उत्साह
उच्च शिक्षणाची सोय आणि विकासासाठी मतदान केल्याचे मत पहिल्यांदा मतदान केलेल्या मतदारांनी व्यक्त केले. मतदान करण्यास ते उत्सुक होते. पहिल्यांदा मतदान केल्याबद्दल आनंद आहे. जनप्रतिनिधीने आमचे प्रश्न सोडवावेत, असे मत टिमकी येथील करिश्मा डोबारकर, महाल येथील दीपिका काळी, नेहा गुजरकर, सौरभ गोडे आणि बंटी गोडे यांनी व्यक्त केले.
काँग्रेस व एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये तणाव
मोमीनपुरा कब्रस्तान रोडवरील महापालिकेच्या उर्दू शाळेच्या मतदान केंद्रात दुपारी ४ च्या सुमारास मतदारांना आकर्षित करण्याच्या कारणावरून काँग्रेस व एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केंद्राबाहेर काढले.
मतदान केंद्रात प्रचारावरून वाद
मोमीनपुरा येथील मतदार एका केंद्रात एमआयएमच्या महिला कार्यकर्त्या पक्षाचा प्रचार करीत असताना मतदारांनी आक्षेप घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणताही वाद घातला नसल्याचे काँग्रेसचे मत आहे.
‘प्रीसायडिंग’ अधिकाऱ्याचा हेकेखोरपणा
‘प्रीसायडिंग’ अधिकारी मनमोहन दास गोयल यांनी निवडणुकीचे वृत्तांकन करण्यास गेलेल्या प्रतिनिधीला बाहेरचा रस्ता दाखविला. गोयल चिटणवीसपुरा मराठी प्राथमिक शाळेतील ५५/२५८ मतदान केंद्रावरील खोली क्र. ३ मध्ये कार्यरत होते. प्रतिनिधीने त्यांना खोलीत झालेल्या मतदानाची टक्केवारी विचारली होती. मी सांगणार नाही, अशी हेकेखोर भूमिका त्यांनी घेतली.
५०.८८ टक्के मतदानाची नोंद
मोमीनपुरा येथील उर्दू अप्पर प्रायमरी स्कूल, हाजी जलील चौधरी समाजभवन, मनपा हाजी अब्दुल मजीद लीडर उर्दू माध्यमिक शाळा, यंग मुस्लीम फुटबॉल ग्राऊंड हॉल, डोबीनगर येथील उर्दू प्राथमिक स्कूल, बंगाली पंजा येथील मनपा मराठी प्राथमिक शाळा, जुनी मंगळवारी येथील उषाबेन चंद्रकांत ठाकर वूमेन्स कॉलेज केंद्र, चिटणवीसपुरा येथील चिटणवीसपुरा मराठी प्राथमिक शाळा, छत्रपती ज्युनियर कॉलेज, छत्रपती शाहू महाराज वाचनालय, सी.पी. अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालय, महाल येथील न्यू इंग्लिश हायस्कूल, बजेरिया, हंसापुरी येथील शाळांमधील केंद्रावर सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ७.७१ टक्के मतदान झाले. तर सकाळी ९ ते ११ पर्यंत १६.०६ टक्के, सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत २६.११ टक्के, दुपारी १ ते ३ पर्यंत ३७.३६ टक्के, दुपारी ३ ते सायंकाळी ५ पर्यंत ४६.८५ टक्के आणि सायंकाळी ६ पर्यंत ५०.८८ टक्के मतदानाची नोंद झाली.

४एकूण मतदार ३,२४,१५८
४पुरुष १,६३,५६६
४महिला १,६०,५८१
४मतदान केंद्रे ३०५

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Central Nagpur: Who will be the 'Central'? Voting 50.88%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.