एलआयटीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; विशेष अनुदानही मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2023 20:41 IST2023-03-09T20:41:24+5:302023-03-09T20:41:55+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या दहा संस्थेत सहभागी असलेल्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अर्थसंकल्प सादर करताना केली.

एलआयटीला अभिमत विद्यापीठाचा दर्जा; विशेष अनुदानही मिळणार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या दहा संस्थेत सहभागी असलेल्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी) या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अर्थसंकल्प सादर करताना केली. ही घोषणा करून फडणवीस यांनी नागपूरला आणखी एक भेट दिली.
एलआयटी ही नागपुरातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थेपैकी एक आहे. या संस्थेची स्थापना १९४२ मध्ये झाली. बीटेक, एमटेक आणि पीएच.डी. अभ्यासक्रम असलेल्या या शैक्षणिक संस्थेचा वैभवशाली इतिहास आहे. तसेच विद्यापीठाच्या उत्पन्नाचे एक मोठे स्त्रोतसुद्धा आहे. काही महिन्यांपूर्वीच या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचे शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतर संस्थेकडून संबंधित विभागांना प्रस्तावसुद्धा पाठवण्यात आले. निधीची तरतूद नसल्याने काम अडकले होते. मागच्याच वर्षी २४ डिसेंबर २०२२ रोजी संस्थेच्या एल्युमिनी असोसिएशनतर्फे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एलआयटीला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची वचनपूर्ती त्यांनी केली. नवीनीकरण व नूतनीकरण करण्यासाठी संस्थेला विशेष अनुदानही देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
काही दिवसांपूर्वीच एलआयटीला नॅकतर्फे ‘ए’ ग्रेड सुद्धा मिळाले. अभिमत विद्यापीठाचा दर्जा असल्याने संस्था आता नागपूर विद्यापीठापासून स्वतंत्र होईल. तसेच अभ्यासक्रम अपग्रेडेशनसह परीक्षा व्यवस्थाही स्वतंत्र होईल. यामुळे विकासाला गती मिळेल.
- विद्यापीठाच्या अपग्रेडेशनला मिळणार मदत
राज्यातील १० विद्यापीठ आणि संस्थांना ५०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि महाराष्ट्र विधि विद्यापीठाचाही समावेश आहे. विधी विद्यापीठाला इमारत बांधकामासाठी निधी दिला जाईल, तर नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासासाठी निधी मिळेल. नागपूर विद्यापीठ यंदा शताब्दीमहोत्सव साजरा करीत आहे. विद्यापीठाला १०० कोटी रुपये देण्याची मागणी सुरुवातीलाच करण्यात आली होती. परंतु सरकारकडून अद्याप घोषणा झाली नव्हती. अर्थसंकल्पात अनुदान मंजूर केल्याने अनेक अडकलेली कामे पूर्ण होतील. तसेच अपग्रेडेशनच्या दिशेनेही प्रयत्न केले जातील.