नागपूरकरांचा जर्मनीत ढोल-ताशा, लेझीमसह गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2022 20:27 IST2022-09-08T20:25:44+5:302022-09-08T20:27:08+5:30
Nagpur News मूळचे नागपूरकर असलेल्या व जर्मनी येथील एरलांगन शहरात स्थायिक झालेल्या गणेशभक्तांनी जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला.

नागपूरकरांचा जर्मनीत ढोल-ताशा, लेझीमसह गणेशोत्सव
नागपूर : मूळचे नागपूरकर असलेल्या व जर्मनी येथील एरलांगन शहरात स्थायिक झालेल्या गणेशभक्तांनी जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात लेझीम नृत्य सादर करीत, तसेच भारतीय महापुरुषांची वेशभूषा धारण करीत जर्मनीत मिनी इंडियाचे दर्शन घडविले.
मराठी विश्व फ्रांकेन मंडळाचे संस्थापक रश्मी गावंडे, तृप्ती सपकाळ, अमोल कांबळे, प्रशांत गुळस्कर यांच्यासह बरेच नागपूरकर व महाराष्ट्रीय जर्मनीत स्थायिक झाले आहेत. या सर्वांनी पुढाकार घेत यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला. रमणबाग युवा मंच, जर्मनी या ढोल-ताशा पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने पुण्याचा अलका चौक डोळ्या पुढे उभा केला. १८ जणांच्या ढोल, ताशा पथकांसोबत ३८ महिला व पुरुषांनी लेझीम सादर करून उपस्थित जर्मन आणि जर्मनी स्थित भारतीयांची मने जिंकली.
सुरुवातीला या मंडळाने लहान मुलांना शाडूमातीपासून गणपती मूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण दिले. यामध्ये २५ मुलांनी सहभाग घेऊन छान व सुबक गणेशमूर्ती तयार केल्या. या भारतीय मूर्तिकारांसोबत जर्मनीच्या नागरिकांनाही फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.
सांस्कृतिक वारसा जपला
- गणेश उत्सव कार्यक्रमात प्रथेनुसार गणेशमूर्ती स्थापना, आरती, अथर्वशीर्ष पठण, राजोपचार, सवाद्य मिरवणूक व विसर्जन करण्यात आली. हा कार्यक्रम एरलांगन राटहाऊस म्हणजे तेथील गव्हर्नमेंट ॲाफिससमोर आयोजित करण्यात आला होता. प्रथमच हा कार्यक्रम खुल्या मैदानावर व खूप मोठ्या प्रमाणावर घेण्यात आला. जर्मनी आणि युरोपचा झेंडा जिथे कायम उंचावर फडकतो तिथे आपला भगवा फडकवून आपला सांस्कृतिक वारसा जपण्यात आला.