Maharashtra Election 2019; कामठी मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; भाजपचे अधिकृत उमेदवार कोण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:50 IST2019-10-04T15:28:24+5:302019-10-04T15:50:10+5:30
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदार संघात निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या काही तासांमध्ये नाट्यमय घडामोडी झाल्या.

Maharashtra Election 2019; कामठी मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; भाजपचे अधिकृत उमेदवार कोण ?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात भाजपच्या उमेदवारीवरून दुपारी २ ते ३ या काळात नाट्यमय घडामोडी झाल्या. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या सत्रात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज सादर केला होता. दुपारी ३ वाजेपर्यंत ज्योती बावनकुळे यांना पक्षाचा ‘बी’ फार्म देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. दरम्यान ज्योती बावनकुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माजी जि. प.अध्यक्ष निशा सावरकर यांचे पती टेकचंद सावरकर आणि माजी जि.प.सदस्य अनिल निधान यांना कामठीच्या तहसील कार्यालयातून उमेदवारी अर्ज नेले. दुपारी २.४५ वाजता सावरकर आणि निधान निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या दालनात पोहोचले. त्यांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. याच दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार व भाजपचे संघटन मंत्री श्रीकांत देशपांडे तहसील कार्यालयात पोहोचले. त्यांनी बंद लिफाफ्यातील ‘बी’ फार्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. यात पक्षांकडून पहिल्या क्रंमाकावर टेकचंद सावरकर तर दुसऱ्या क्रंमाकावर अनिल निधान यांचे नाव होते. मात्र हा घटनाक्रम संपत नाहीच तर भाजप नेते आनंदराव राऊत तहसील कार्यालयात दाखल झाले. त्यांनी अनिल निधान हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. शेवटी या नाट्यमय घडामोडीवर निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.