Maharashtra Election 2019; उपराजधानीतील रणधुमाळीत यंगिस्तानचा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 10:46 IST2019-10-15T10:44:24+5:302019-10-15T10:46:53+5:30
नागपुरातील सर्वात तरुण उमेदवार हा २६ वर्षांचा आहे तर सर्वात वयोवृद्ध उमेदवार ६८ वर्षांचे आहेत हे विशेष.

Maharashtra Election 2019; उपराजधानीतील रणधुमाळीत यंगिस्तानचा बोलबाला
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पन्नाशी उलटल्यानंतरच खऱ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात होते, असे एरवी म्हणतात. मात्र गेल्या काही काळापासून ही धारणा मोडीत निघाली असून विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात सर्वच पक्षांनी तरुण उमेदवारांना संधी दिली आहे. एकूण उमेदवारांपैकी सुमारे ४६ टक्के उमेदवार हे ४५ च्या आतील आहेत. नागपुरातील सर्वात तरुण उमेदवार हा २६ वर्षांचा आहे तर सर्वात वयोवृद्ध उमेदवार ६८ वर्षांचे आहेत हे विशेष.
निवडणूक आयोगातर्फे उमेदवारांच्या वयाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘लोकमत’ने सर्व उपलब्ध शपथपत्रांची विस्तृत पाहणी केली असता वरील बाब समोर आली आहे. विधानसभा निवडणुकांतील सहा मतदारसंघात एकूण ८४ उमेदवार भाग्य आजमावत आहेत. मागील अनेक निवडणुकांपासून तरुण मतदारांमध्ये बरीच जागृती आली आहे. तरुणाईच्या मतांना महत्त्व आले असून यामुळेच राजकीय पक्षांचा चेहरादेखील तरुण होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन नागपुरातदेखील सर्वच पक्षांनी तरुणांना लक्षणीय प्रमाणात उमेदवारी दिली आहे. नागपुरातून ४५ हून कमी वय असलेले ३९ (४६.४३ %) उमेदवार निवडणूक लढत आहेत.
तिशीच्या आतील सहा उमेदवार
महाविद्यालयांतून बाहेर पडल्यानंतर तिशीपर्यंत अनेक तरुण ‘करिअर’च्या वाटा शोधत असतात. तिशीच्या आतील सहा उमेदवारांनी राजकीय क्षेत्रात भाग्य आजमवायचे ठरविले आहे. निवडणुकांतील सर्वात लहान उमेदवाराचे वय २६ इतके आहे. २६ वर्षांचे नागपुरात एकूण तीन उमेदवार आहेत. तर ३१ ते ३५ या वयोगटातीलदेखील सहा उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे ६० वर्षानंतर ज्येष्ठ नागरिक निवृत्तीचे जीवन जगताना दिसतात. साठीच्या वरील पाच उमेदवार मैदानात असून यातील तीन उमेदवारांचे वय ६५ हून अधिक आहे.
मध्य नागपूर सर्वात तरुण
सहा मतदारसंघातील उमेदवारांचे सरासरी वय काढले असता मध्य नागपूर सर्वात तरुण मतदारसंघ असल्याचे दिसून आले. येथील उमेदवारांचे सरासरी वय ४२ वर्षे इतके आहे. दक्षिण नागपुरातील उमेदवारांचे सरासरी वय ४७ वर्षे ८ महिने आहे. याशिवाय दक्षिण-पश्चिम नागपूर (४६ वर्ष ८ महिने), उत्तर नागपूर (४४ वर्ष ४ महिने), पूर्व नागपूर (४६ वर्ष ६ महिने), पश्चिम नागपूर (४५ वर्ष ९ महिने) असे उमेदवारांचे सरासरी वय आहे.