‘तुम्ही, होमगार्ड ना?’ म्हणत पंखे बंद, पाणीही नाकारले; वांद्रे स्थानकात घडला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 10:38 IST2026-04-27T10:38:11+5:302026-04-27T10:38:39+5:30
‘त्या’ वादानंतर जवानांची कोंडी; अमानवी वागणूक मिळत असल्याचा आराेप

‘तुम्ही, होमगार्ड ना?’ म्हणत पंखे बंद, पाणीही नाकारले; वांद्रे स्थानकात घडला धक्कादायक प्रकार
मनीषा म्हात्रे
मुंबई - शहराच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्ड जवानांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले. विलेपार्ले स्थानकात होमगार्ड व मोटरमन यांच्यात नुकत्याच झालेल्या वादानंतर रेल्वे स्थानकांवर ड्युटी करणाऱ्या होमगार्ड जवानांच्या अडचणी वाढल्याचा आरोप होत आहे. रात्री शेवटची लोकल गेल्यानंतर काही तास विश्रांतीसाठी प्लॅटफॉर्मवर जवान थांबतात. परंतु, वांद्रे स्थानकात पंखे बंद करण्यात येत आहेत.
एवढेच नाही तर सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकात मोटरमनच्या केबिनमधून थंड पाणी घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचा आरोप आहे. मुंबईत चार ते पाच हजार होमगार्ड असून, त्यापैकी केवळ दीड ते दोन हजार कार्यरत आहेत. एक महिना काम तर दोन महिने घरी, अशी त्यांची कामासाठी वणवण आहे. त्यामुळे घरची चूल कशी पेटवायची, ही चिंता तर दुसरीकडे, प्रश्न उपस्थित केले तर वरिष्ठांकडून दखल घेण्याऐवजी कामावरून काढण्याची भीती त्यांना आहे.
वादाची ठिणगी का पडली?
२१ एप्रिल रोजी विलेपार्ले स्थानकात होमगार्ड आणि मोटरमनच्या वादात होमगार्ड मनोज सावंत याने मोटरमनला लाथ मारली. याप्रकरणी एनसी दाखल करण्यात आली. मात्र, या प्रकरणात संबंधितावर गुन्हा नोंदवत कडक कारवाईची मागणी होत आहे. या घटनेनंतर होमगार्डच्या सर्वच कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा त्यांचा आराेप आहे.
शनिवारी काय घडले?
शनिवारी रात्री शेवटची लोकल गेल्यानंतर होमगार्डचे जवान वांद्रे स्थानकात आले. पुन्हा सकाळच्या लोकलमध्ये त्यांची ड्युटी होती. अशावेळी काही तास आराम म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे वांद्रे स्थानकातील तिकीट काऊंटर गाठले. मात्र तिथे झोपण्यासाठी जाताच पंखे बंद केले गेले. याबाबत विचारणा करताच त्यांना विद्युत विभागाशी बोलण्यास सांगितले. त्यांनी तिथे विनंती केली, मात्र तिथे देखील कोणी सहकार्य केले नाही.
होमगार्डची अडवणूक करणे शक्य नाही. कोणी ग्रुप करून असे करत असल्यास चौकशी करू. कुणाचीही गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेण्यात येत आहे. - विनीत अभिशेष, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे