घणसोलीतूनही बुलेट ट्रेन खोदकाम, दुसऱ्या टीबीएमची शाफ्टमध्ये जोडणी सुरू; सावली ते विक्रोळीदरम्यान ‘भुयार’काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 07:56 IST2026-04-14T07:56:29+5:302026-04-14T07:56:58+5:30
Mumbai Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) मुंबईत दाखल झाल्यामुळे भुयारी खोदकामाला वेग आला आहे. घणसोलीजवळील सावली येथे दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनच्या (टीबीएम) जोडणीचे काम काम सुरू करण्यात आले. सावली ते विक्रोळीदरम्यान भुयार तयार करण्याचे काम दुसऱ्या टीबीएमचे असणार आहे.

घणसोलीतूनही बुलेट ट्रेन खोदकाम, दुसऱ्या टीबीएमची शाफ्टमध्ये जोडणी सुरू; सावली ते विक्रोळीदरम्यान ‘भुयार’काम
मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) मुंबईत दाखल झाल्यामुळे भुयारी खोदकामाला वेग आला आहे. घणसोलीजवळील सावली येथे दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनच्या (टीबीएम) जोडणीचे काम काम सुरू करण्यात आले. सावली ते विक्रोळीदरम्यान भुयार तयार करण्याचे काम दुसऱ्या टीबीएमचे असणार आहे.
राज्यात बुलेट ट्रेन धावती करण्यासाठी २१ किमी लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) आणि टीबीएम या पद्धतीने बोगद्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सद्य:स्थितीत ५ किमी बोगद्याचे खोदकाम एनएटीएम पद्धतीने पूर्ण झाले आहे. उर्वरित १६ किमीचे काम टीबीएमच्या मदतीने पूर्ण होईल. विक्रोळीत पहिल्या टीबीएमची जोडणी यापूर्वीच सुरू झाली आहे. या टीबीएमच्या मदतीने वांद्रे कुर्ला संकुलाच्या दिशेने भुयार तयार करण्यात येणार आहे.
विक्रोळीच्या दिशेने बोगदा; खोदकामाचा वेग प्रतिमिनीट ४९ मिमी
सावली येथे जमिनीपासून तब्बल ३९ मीटर खोलीवर असलेल्या शाफ्टमध्ये दुसरे टीबीएम उतरवण्यास सुरुवात झाली आहे. याच ठिकाणाहून ही यंत्रणा विक्रोळीच्या दिशेने बोगदा खोदण्याचे काम करणार आहे. १९० मेट्रिक टन वजनाचा, १८ मीटर लांब, १० मीटर रुंद आणि ९ मीटर उंचीचा गॅन्ट्री शाफ्टमध्ये टीबीएमचे सुट्टे भाग उतरवण्यात आले आहे.
बुलेट ट्रेन टीबीएम अत्यंत नियंत्रित व सुरक्षित पद्धतीने काम करण्यासाठी तयार केल्या आहेत. खोदकामाचा वेग प्रतिमिनीट ४९ मिमीपर्यंत राहील. मुख्य बोगदा खोदकामाची मोहीम ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होऊ शकते. दरम्यान, आसपासच्या इमारती व पायाभूत सुविधांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक मॉनिटरिंग उपकरणे मोठ्या प्रमाणावर बसवली जात आहेत.