श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, तर भालचंद्र नेमाडेंना साहित्यभूषण पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 05:32 IST2026-02-18T05:31:32+5:302026-02-18T05:32:44+5:30
साहित्य क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल गौरव

श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, तर भालचंद्र नेमाडेंना साहित्यभूषण पुरस्कार जाहीर
मुंबई : साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना २०२५ चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, तर ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना २०२५ चा साहित्यभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रातील महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी मंत्रालयात केली.
विंदा करंदीकर जीवनगौरव आणि साहित्यभूषण या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप दहा लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे. प्रकाशन संस्थेसाठी दिल्या जाणाऱ्या श्री. पु. भागवत पुरस्काराचे स्वरुप पाच लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे आहे, तर भाषा अभ्यासक आणि भाषा संवर्धक पुरस्कारांचे स्वरुप प्रत्येकी दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह असे आहे.
प्रकाशन संस्थेसाठी दिला जाणारा श्री. पु. भागवत पुरस्कार-२०२५ नांदेड येथील निर्मल प्रकाशनला जाहीर झाला.
डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. दिलीप धोंडगे आणि इचलकरंजी येथील आपटे वाचन मंदिर यांना घोषित करण्यात आला.
कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार-२०२५ विनोद कुलकर्णी आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेला जाहीर झाला आहे.
नाशिक येथे होणार चौथे विश्व मराठी संमेलन
नाशिक येथे २६ फेब्रुवारी ते १ मार्च असे चार दिवस चौथे विश्व मराठी संमेलन आयोजित केले जाणार आहे. या संमेलनात या पुरस्कारांसह यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांचेही वितरण केले जाणार आहे. विश्व मराठी संमेलनात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणाही यावेळी करण्यात आली. यात कलारत्न पुरस्कार संगीतकार अजय-अतुल गोगावले, विश्व मराठी संमेलन विशेष पुरस्कार शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती कुरेकर यांना जाहीर झाला.