The video of the election of the Municipal Committees will be flown by video conference | पालिका समित्यांच्या निवडणुकांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उडणार बार

पालिका समित्यांच्या निवडणुकांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उडणार बार

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात लांबणीवर पडलेल्या महापालिकेच्या वैधानिक, विशेष आणि प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या निवडणुका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र आतापर्यंत पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असलेल्या भाजपने शिवसेनेची कोंडी करण्याचे मनसुबे आखले आहेत. शिवसेनेच्या बरोबरीनेच भाजपकडे संख्याबळ असल्याने या निवडणुकीत विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
महापालिकेतील सर्व समित्यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ ३१ मार्च रोजी संपुष्टात येतो. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या पदांसाठी निवडणुका घेण्यात येतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका यावर्षी एप्रिल महिन्यात झाल्या नाहीत. त्यामुळे कार्यकाळ संपून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले तरी या समित्यांमार्फत होणारी विकासकामे गेल्या सहा महिन्यांपासून खोळंबली आहेत. परिणामी, आणखी विलंब टाळण्यासाठी या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचा दबाव भाजपकडून सुरू आहे.
दरम्यान, लॉकडाऊन जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने खुले होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने परिपत्रक काढून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. यावेळी पहिल्यांदाच शिवसेनेसमोर भाजप आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे सध्या ९५ संख्याबळ असून राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत असल्याने सत्तेला धोका नाही. मात्र महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधी पक्षांच्या बाकावर असल्याने समित्यांच्या निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकेल.

निवडणुकीतील
स्वाक्षरींचा पेच
मतदानात सहभागी सदस्यांच्या सह्या आवश्यक असल्याने त्याशिवाय निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यावर काय तोडगा काढायचा यासाठी पालिका प्रशासन राज्याच्या नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन करण्याची मागणी करणार आहे.

सध्याचे
संख्याबळ
शिवसेना ९५
भाजप ८३
काँग्रेस २९
राष्ट्रवादी ८
सपा ६
मनसे १
एमआयएम २

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The video of the election of the Municipal Committees will be flown by video conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.