रेल्वेचे खासगीकरण करताना प्रवासी केंद्रस्थानी हवा अन् तिकीट दरावर सरकारचे नियंत्रण हवे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 02:02 AM2020-01-16T02:02:29+5:302020-01-16T02:03:23+5:30

रस्त्यावरील प्रवासी वाहतूक खासगी बसेससाठी सुरू झाल्यानंतर एसटी महांमडळ बंद पडेल, असे तर्क अनेकांनी मांडले होते. मात्र असे काहीही न होता प्रवासाचा दर्जा सुधारला.

Travelers should be at the center while privatizing the train! | रेल्वेचे खासगीकरण करताना प्रवासी केंद्रस्थानी हवा अन् तिकीट दरावर सरकारचे नियंत्रण हवे!

रेल्वेचे खासगीकरण करताना प्रवासी केंद्रस्थानी हवा अन् तिकीट दरावर सरकारचे नियंत्रण हवे!

Next

देशातील पहिली खासगी तत्त्वावरील दिल्ली ते लखनऊ तेजस एक्स्प्रेस सुरू झाली आहे. तर, आता दुसरी मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. पण रेल्वेचे खासगीकरण करताना प्रवासी केंद्रस्थानी ठेवत, त्यांना उत्तम सेवा देण्याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे, असे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’ या व्यासपीठावर मांडले. पण खासगीकरण करताना मनमानी कारभार, अवाजवी तिकीट दर, कंत्राटदारांची मक्तेदारी अशा बाबी घडू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त करीत खासगी एक्स्पे्रस सुरू झाल्यामुळे इतर एक्स्प्रेसच्या वेळेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर प्रवाशांचा अवेळी प्रवास होईल. तेजस एक्स्प्रेसला मिळणाऱ्या सुविधा या भारतीय रेल्वेमधील धावणाºया एक्स्प्रेसमध्ये मिळणे आवश्यक आहे, असे मत वाचकांनी व्यक्त केले. त्यातील प्रतिक्रियांचा घेतलेला हा धांडोळा...

स्पर्धात्मकतेतून सेवेचा दर्जा वाढण्यास मदत होईल
येत्या काही दिवसांत देशातील अनेक प्रमुख शहरांदरम्यान खासगी एक्स्प्रेस धावण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी अनेक पर्याय उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. भारतीय रेल्वे ही रेल्वेमार्गाच्या लांबीच्या बाबतीत जगात तिसºया क्रमांकाची असताना सेवेच्या दर्जाबाबतीत मात्र अन्य छोट्या-मोठ्या विकसित देशांच्या तुलनेत खूप दूर आहे. देशातील सर्वाधिक रोजगारनिर्मिती करणाºया या सार्वजनिक उपक्रमाकडे राजकीयदृष्ट्या केवळ सोन्याची अंडी देणारी कोंबडी याच भावनेने पाहिले गेल्यामुळे रेल्वेसेवेचा दर्जा आजपर्यंत सुमार दर्जाचाच राहिलेला आहे. जर खासगी वाहतुकीमुळे प्रवाशांची गैरसोय टळत असेल तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. पण खासगी तत्त्वावर रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीस परवानगी देताना प्रवाशांची व प्रवासाची सुरक्षितता, तिकिटांच्या दरनियंत्रणासाठी व अन्य बाबींच्या
नियमनासाठी ट्रायच्या धर्तीवर एका नियामक आयोगाची स्थापना करावी. प्रवासाचे दर अवाजवी होणार नाहीत याकडे लक्ष देण्यात यावे. खासगी रेल्वे वाहतुकीस परवानगी दिल्यास सध्याच्या सार्वजनिक रेल्वेचा कारभार, व्यवस्थापन व रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांची मानसिकता प्रवासाभिमुख व सौजन्य व कर्तव्यतत्पर बनेल अशी आशा करावयास हरकत नाही. - राजकुमार पाटील, मुरबाड

सेवा सुधारण्यावर भर द्यावा
मुंबईच्या लाइफलाइनचे खासगीकरण होईल, पण ते का होत आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. सध्या जवळपास सर्वच राज्यकर्त्यांना सरकारी सेवांचे खासगीकरण व्हावे, यातच जास्त रस दिसतो. त्यामुळे सरकारची लोकल योग्य सेवा पुरवत नसल्याने तिचे खासगीकरण करायचे. खासगीकरण करून सेवा पुरविण्याचा सरकारचा डाव आहे. परिणामी, सार्वजनिक सेवा चालविण्यासाठी खासगी कंपन्यांना पाचारण केले गेले. तेच रेल्वेबाबत होते आहे. मात्र आर्थिक तोट्याचे कारण देऊन, देशांची डगमगती अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी त्यांचे खासगीकरण करून त्या मोठ्यामोठ्या उद्योगपतींच्या दावणीला बांधण्याचे कारस्थान मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लोकलसारखा कमी खर्चाचा दुसरा सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध नाही. सरकारी मालकीच्या आस्थापना सांभाळणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाºयांच्या भ्रष्ट कारभारामुळे व अकार्यक्षमतेमुळे खासगीकरण होत आहे. अशा प्रकारामुळे सरकार खासगीकरणाकडे का वळणार नाही ? काही दिवसांपूर्वीच देशातील एक्स्प्रेस सेवा या खासगी पद्धतीने चालविण्यास सुरुवात झाली. आता मुंबईच्या लाइफलाइन सेवांचेदेखील खासगीकरण करण्याचा धडाका टप्प्याटप्प्याने सुरू आहे. खासगीकरणातून सेवा सुधारण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा आहे. - कमलाकर जाधव, बोरीवली.

प्रवाशांना उत्तम सेवा हाच उद्देश हवा
खासगीकरणातून रेल्वे वाहतूक सेवा चालविण्याच्या धोरणांना मंजुरी देऊन सरकार एक प्रकारे खासगी सेवांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करू पाहत आहे किंवा आपल्या क्षमतेची जबाबदारी खासगी चालकांकडे सोपवू पाहत आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देण्याचा प्रामाणिक उद्देश असल्यास त्याचे स्वागतच. खासगी मालकांकडे रेल्वेसेवा सोपविल्यास विविध प्रकारच्या सेवांमध्ये शिस्त आणि नियमितता येईल. परिणामी, प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण आणता येईल. खासगी मालक तांत्रिक, यांत्रिक नियंत्रण पद्धतीत जरूर त्या सुधारणा वेळीच पार पडतील. वक्तशीरपणामुळे प्रवाशांचा प्रवासवेळ वाचेल. गाड्यांच्या अंतर्गत सुविधांवर देखरेख वाढून आर्थिक नुकसान टळेल. यासारखे बरेच किफायती बदल रेल्वेत दिसतील. ज्या सेवा रेल्वे खासगी चालकांकडे सुपुर्द करील त्यांच्या दर्जाप्रमाणे प्रवाशांना त्याची किंमत मोजावी लागेल. जेथे खासगीकरण तेथे वाढीव भाडे आकारणी केली जाईल. खासगीकरण अपरिहार्य, मात्र त्याचे परिणाम भाड्यामध्ये असह्य वाढ व प्रवाशांचा नाइलाज अशा प्रकारचे नसावेत. - स्नेहा राज, गोरेगाव

खासगीकरणामुळे रेल्वेतील सेवासुविधा वाढतील!
रेल्वेची सध्याची वाहतूक ही प्रवासाभिमुख आहे. ही सेवा प्रवासाभिमुख होण्यासाठी पर्यायी उपायाची अर्थात रेल्वेच्या खासगीकरणाची गरज होती. रेल्वेने आता काही मार्गांवर खासगी मालकीतून गाड्या धोरणाला मंजुरी देत या खासगी सेवेने प्रवाशांना कोणकोणत्या सेवा द्याव्यात, तिकीटदर काय असावेत, कोणते थांबे असावेत याचे स्वातंत्र्य खासगी चालकांना दिले आहे. प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, अधिकाधिक प्रवाशांनी सेवेचा फायदा घ्यावा यासाठी प्रयत्न करण्यात खासगी मालक कसूर करणार नाहीत. विशेषत: प्रवाशांना काय हवे याचा विचार करूनच अधिकाधिक चांगल्या व गर्दी आणि फेºयांचे नियोजन करूनच गाड्या चालवून स्पर्धेत जम बसविण्यासाठी खासगी मालक नक्कीच प्रयत्न करतील. प्रवाशांना चांगल्या सेवा-सुविधा देताना कदाचित अधिक दाम या खासगी सेवेसाठी मोजावे लागेल. चांगली सेवा मिळत असेल तर प्रवासी ते नक्कीच सहन करतील. लवकरच ‘तेजस’ची मुंबई-अहमदाबाद ही खासगी रेल्वे सुरू होत आहे. रेल्वेने काही मार्गांवर खासगी धोरणातून गाड्या धोरणाला दिलेली मंजुरी ही रेल्वे सेवासुविधा वाढण्यासाठी व प्रवासाभिमुख सेवेसाठी घेतलेला एक चांगला निर्णय म्हणता येईल. - मुरलीधर धंबा, डोंबिवली

तिकीट दरावर सरकारचे नियंत्रण हवे!
रेल्वेतील सोयी-सुविधांबाबत प्रवासी पूर्णत: समाधानी नाहीत. त्यामुळे काही मार्गांचे खासगीकरण करणे, प्रवाशांच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. खासगी संस्थांमार्फत सेवा पुरवली जाणार असल्यामुळे सुविधा पुरविण्यासाठी रेल्वेबरोबर एक प्रकारची स्पर्धा निर्माण होईल. त्याचा फायदा प्रवाशांना मिळेल. या खासगी रेल्वे सेवेवर पूर्ण नियंत्रण खासगी चालकांचे राहणार असले तरी त्याच्या तिकीटदरांवर नियंत्रण मात्र सरकारचे राहणे अत्यंत गरजेचे आहे. रेल्वेप्रवास करणारे बहुतांश प्रवासी सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यामुळे खासगी चालकांमार्फत त्यांची लूट होता कामा नये. चांगल्या व किफायतशीर सुविधा व वक्तशीरपणा रेल्वेमध्ये येणे अपेक्षित आहे. त्यामध्ये रेल्वे असफल ठरताना दिसत असल्याने काही मार्गांचे खासगीकरण हा यावर एक चांगला तोडगा असला तरी या खासगी चालकांकडून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक व्हायला नको. - वैभव पाटील, घणसोली

रेल्वेचा दर्जा सुधारेल
देशभरातील विविध मार्गांवर रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे रेल्वे सेवा वाढवण्याची मागणी वाढत आहे. दुसरीकडे रेल्वेच्या वाढत्या तोट्यामुळे रेल्वे सेवा वाढवण्यात, प्रवाशांना आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात, तिची गुणवत्ता सुधारण्यात रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. अशा परिस्थितीत रेल्वे मंत्रालयाने खासगी क्षेत्राशी प्रायोगिक तत्त्वावर भागीदारी करून देशभरातील १०० मार्गांवर १५० खासगी ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तो अगदी समयोचित असाच आहे. याआधी इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी)च्या वतीने देशातील पहिली खासगी रेल्वे तेजस एक्स्प्रेस दिल्ली ते लखनऊ दरम्यान ६ आॅक्टोबर २०१९ पासून सुरू झाली आहे. या खाजगी ट्रेनने आरामदायक प्रवास, प्रवासाचा कमी वेळ, प्रवासी विमा, सामान चोरी विमा, तिकीट रद्द करण्यासाठी कमी केलेले शुल्क अशा अनेक सुविधा दिल्या आहेत. यामुळे प्रवाशांनीही या खासगी ट्रेनचे स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर खासगीकरणामुळे रेल्वे वाहतूक अधिकाधिक प्रवासीभिमुख होऊन रेल्वेचा दर्जा नक्कीच सुधारेल यात शंका नाही. - प्रदीप मोरे, अंधेरी

प्रवासीभिमुख सेवेला प्राधान्य हवे!
रस्त्यावरील प्रवासी वाहतूक खासगी बसेससाठी सुरू झाल्यानंतर एसटी महांमडळ बंद पडेल, असे तर्क अनेकांनी मांडले होते. मात्र असे काहीही न होता प्रवासाचा दर्जा सुधारला. अनेक पर्याय उपलब्ध झाले, कोठूनही, कुठेही जाणे सोपे झाले. रेल्वेच्या खासगीकरणामुळे रेल्वेचा दर्जा, वेग, नक्की सुधारेल. भारतातील सर्व प्रकारच्या प्रशासकीय व शासकीय तिढ्यात नागरिकांच्या गरजा, वेळ याला फाटा मिळायचा. परंतु प्रशासन याला जबाबदार आहे. कर्मचारी, युनियनबाजी, पक्ष, सत्ताधारी यात अडकलेल्या सार्वजनिक सुविधा जणूकाही स्वत:च्याच मालमत्ता असल्यासारखे वापरण्याची सवयच लागली होती. भारताच्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक सुविधा जनतेसाठी असतात, हेच हे लोक विसरलेले असतात. हे या माध्यमातून कमी होण्यास मदत होईल. पण हे बदल करीत असताना प्रवासी केंद्रस्थानी असायला हवेत. तसेच

Web Title: Travelers should be at the center while privatizing the train!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे