पटसंख्येअभावी शाळांना ‘टाळे’

By Admin | Updated: July 18, 2015 23:44 IST2015-07-18T23:44:44+5:302015-07-18T23:44:44+5:30

पटसंख्येअभावी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बहुतांश शाळांना ‘घरघर’ लागली असताना आतापर्यंत नऊ शाळा बंद करण्याची नामुष्की शिक्षण मंडळ प्रशासनावर ओढवली आहे.

'Talley' for schools due to lack of education | पटसंख्येअभावी शाळांना ‘टाळे’

पटसंख्येअभावी शाळांना ‘टाळे’

- प्रशांत माने,  कल्याण
पटसंख्येअभावी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बहुतांश शाळांना ‘घरघर’ लागली असताना आतापर्यंत नऊ शाळा बंद करण्याची नामुष्की शिक्षण मंडळ प्रशासनावर ओढवली आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा वेळेवर मिळाल्या नाहीत तसेच शाळांचा दर्जा सुधारला नाहीतर हा आकडा यापुढेही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. केडीएमसी परिक्षेत्रात महापालिकेच्या ७४ शाळा होत्या. शाळेची किमान पटसंख्या २० च्या वर असणे बंधनकारक आहे. परंतु, पट अधिकच खालावल्याने गतवर्षात नऊ शाळांना प्रशासनाला टाळे ठोकावे लागले आहे. यात मराठी ५, गुजराती २ तर उर्दू माध्यमाच्या २ शाळांचा समावेश आहे.
आजघडीला मराठी माध्यमाच्या ५१, हिंदी ३, उर्दू ९, तामिळ १, इंग्रजी १ अशा ६५ शाळा सुरू आहेत. गुजराती माध्यमाच्या दोन शाळा पटसंख्येअभावी बंद पडल्याने त्या माध्यमाची एकही शाळा सध्या नाही. शाळांची सद्य:स्थिती पाहता पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही शैक्षणिक सुविधा अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत. काही ठिकाणी संगणकांचीदेखील वानवा असल्याने विद्यार्थी संगणकीय ज्ञानापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. तज्ज्ञ शिक्षकांचीदेखील कमतरता असल्याने काही शाळांमध्ये असलेले संगणक वापराविना धूळखात पडले आहेत. शाळेत प्रवेश देणे सुरू आहे. मोफत पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश, रेनकोट, दप्तरे, पौष्टिक चिक्की आणि शालेय पोषण आहार दिला जातो, असे आवाहन फलकाच्या माध्यमातून केले जात आहे. दरम्यान, यातील पाठ्यपुस्तके शासनाच्या पुढाकाराने उपलब्ध झाली असली तरी अन्य सुविधा आजवर मिळालेल्या नाहीत. सोयीसुविधा वेळेवर न मिळणे, हे पट कमी होण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. शिक्षण मंडळ प्रशासनाची कार्यवाही निविदा प्रक्रियेत अडकली असून घटत जाणारी पटसंख्या ही चिंता वाढविणारी आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्याबाबतचा स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिक्षणप्रेमींचा पुढाकार पाहता ही समाधानाची बाब आहे.
सुविधा वेळेवर मिळाव्यात तसेच शिक्षकांची मंजूर पदे तातडीने भरावीत, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, कल्याण-डोंबिवली या संघटनेच्या वतीनेदेखील सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

Web Title: 'Talley' for schools due to lack of education