शिवसेनेला मिळतील १२ जागा; महायुतीतील जागावाटपाचा असा असेल फॉर्म्युला?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 10:55 AM2024-02-20T10:55:26+5:302024-02-20T10:59:32+5:30

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचं स्वप्न भाजपाने पाहिलं आहे.

Shinde group will get 12 seats? Seat Sharing of mahayuti for loksabha election | शिवसेनेला मिळतील १२ जागा; महायुतीतील जागावाटपाचा असा असेल फॉर्म्युला?

शिवसेनेला मिळतील १२ जागा; महायुतीतील जागावाटपाचा असा असेल फॉर्म्युला?

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकांची लवकरच घोषणा होणार असून राजकीय पक्षांच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचं दिसून येत आहे. एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुतीमध्ये जागावाटपावर तोडगा काढला जात आहे. शिवसेना उबाठा गटाकडून १८ जागांवर दावा करण्यात आल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाला महायुतीत १२ जागा मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांच्यातील लोकसभा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते. त्यानुसार, भाजपा ३२ जागांवर उमेदवार देणार आहे. 

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचं स्वप्न भाजपाने पाहिलं आहे. त्यातच, महायुतीतील सर्वच नेत्यांकडून मोदी हेच तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असे सांगण्यात येते. त्यामुळे, लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाच झुकते माप दिले जात आहे. त्याच अनुषंगाने महायुतीतील जागावाटपातही भाजपाचा वरचष्मा दिसून येतो. महायुतीमधील घटकपक्षांची जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात पोहोचली असून महायुतीतील संभाव्य जागावाटपाचा एक फॉर्म्युलाही समोर आला आहे. 

महायुतीमध्ये लोकसभेला ३२-१२-४ असा फॉर्म्युला निश्चित होत असल्याचे समजते. त्यामध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक ३२ जागा येतील. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला १२ जागा येतील. तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागू शकणार आहे. लोकसभेला भाजपला अधिक जागा मिळाल्या तरी विधानसभेला शिंदे गट आणि अजित पवार गटाला अपेक्षित जागावाटप देऊन खुश केले जाईल, अशीही माहिती आहे. सध्या महायुतीच्या राज्यातील नेत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अंतिम निर्णयानंतरच जागावाटप निश्चित होईल, त्यानंतरच घोषणा होईल, असेही सुत्रांनी सांगितले.

भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात लोकसभेचे जागावाटप कसे होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली होती. त्यातच, शिंदे गट आणि अजित पवार गटाला किती जागा मिळतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, अजित पवार गटाकडे सध्या राष्ट्रवादीचे तीन खासदार आहेत. तरीही त्यांच्या वाट्याला लोकसभेच्या चार जागा येतील. दरम्यान, महाविकास आघाडीत जवळपास ४० जागांवर एकमत झाल्याची माहिती असून ८ जागांवरुन अद्यापही तिढा कायम आहे. 
 

Web Title: Shinde group will get 12 seats? Seat Sharing of mahayuti for loksabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.