अभ्युदय नगरच्या रहिवाशांना ६४१ चौरस फुटांचे घर मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 19:57 IST2026-05-07T19:57:20+5:302026-05-07T19:57:20+5:30
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते संबंधित निविदाकारास प्रकल्पाकरिता स्वीकृती पत्र देण्यात आले.

अभ्युदय नगरच्या रहिवाशांना ६४१ चौरस फुटांचे घर मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : म्हाडाने अभ्युदय नगर, काळाचौकी या म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकास प्रकल्पाकरिता एम. जी. एन. ॲग्रो प्रॉपर्टीज, एन. एन. पी बिल्डकॉन, ओनेस्ट शेल्टर्सची या समुहाची निविदा स्वीकारली आहे. त्यानूसार, येथील रहिवाशांना अस्तित्वात असलेल्या २१० चौरस फुटांच्या घराच्या मोबदल्यात ६४१ चौरस फुटांचे घर मिळणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते गुरुवारी संबंधित निविदाकारास प्रकल्पाकरिता स्वीकृती पत्र देण्यात आले.
अभ्युदय नगर (काळाचौकी) म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास तत्वावर विकासकाची नेमणूक करून विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत राबविण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या २७ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या बैठकीत मान्यता मिळाली होती. त्यानुसार गृहनिर्माण विभागाने ६ मार्च २०२६ रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला. विकासक नेमण्यासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आली. शासनाच्या उच्चाधिकार समितीने दिलेल्या मान्यतेनंतर पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली.
- अभ्युदय नगर, काळाचौकी वसाहतीत १,३३,५९३ चौरस मीटर (३३ एकर) क्षेत्रफळाच्या भूखंडावर सद्यस्थितीत ४८ इमारती आहेत.
- २१० चौरस फुटांची ३४१० घरे आहेत. त्यामध्ये ३३३५ निवासी सदनिका तसेच ७५ अनिवासी गाळ्यांचा समावेश आहे.
- अनेक वर्षांपासून या इमारतींचा विकास प्रलंबित होता.
- म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे याची जबाबदारी सोपविण्यात आली.
- मंडळाने अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास प्रक्रिया सी अँड डी प्रारूपानुसार करण्याचा निर्णय घेतला.
- निविदेस अनेकवेळा मुदतवाढ देऊनही निविदेला प्रतिसाद मिळाला नाही.
- कालांतराने प्रकल्पाच्या निविदा अटींमध्ये बदल करून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
- एकास एक पार्किंग, प्रत्येक सदनिकाधारकाला पाच लाख रुपये कॉर्पस फंड देणे, प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रति सदनिकाधारक पंचवीस हजार रुपये महिन्याला भाडे विकासकाने देणे या अटींचा त्यात समावेश करण्यात आला.