निवासी डॉक्टर असुरक्षितच

By Admin | Updated: July 19, 2015 21:23 IST2015-07-19T21:23:51+5:302015-07-19T21:23:51+5:30

Resident Doctor Unprotected | निवासी डॉक्टर असुरक्षितच

निवासी डॉक्टर असुरक्षितच

>निवासी डॉक्टर असुरक्षितच
पोलिस म्हणतात, कायद्याची माहिती द्या !
मुंबई: जुलै महिन्याच्या सुरुवातीला तीन दिवस निवासी डॉक्टरांनी सुरक्षेचा प्रश्न आणि इतर महत्त्वाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी मासबंक केला होता. मासबंक संपून अवघे १५ दिवस उलटल्यानंतर पुण्याच्या निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला. या प्रकारानंतर राज्यातील चार हजार निवासी डॉक्टर अजूनही असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जानेवारी ते जुलै २०१५ या कालावधीत सुमारे १० निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळेच मध्यवर्ती मार्ड संघटनेने निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावावेत, वेगळे सुरक्षा रक्षक द्यावेत अशी मागणी केली होती. पुढील पाच महिन्यांत हे काम पूर्ण होईल असे आश्वासन देण्यात आले आहे. पण, एखाद्या डॉक्टरला मारहाण झाल्यास गुन्हा दाखल करताना डॉक्टर संरक्षण कायद्यांतर्गत करावा, अशीही मागणी केली होती. पण, पुण्याच्या निवासी डॉक्टरला मारहाण झाल्यानंतर डॉक्टर संरक्षण कायद्याविषयीच्या माहितीची मागणी चक्क पोलिसांकडून करण्यात आली. त्यामुळे या कायद्याविषयी अजूनही अनभिज्ञता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुण्यात निवासी डॉक्टर गुन्हा नोंदवायला गेले तेव्हा पोलिसांनी कायद्याची प्रत द्या, असे निवासी डॉक्टरांना सांगितले. पोलिसांना प्रत देऊनही त्यांनी त्याअंतर्गत गुन्हा रविवार रात्रीपर्यंत दाखल केला नसल्याची माहिती मध्यवर्ती मार्ड संघटना अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी दिली.
डॉ. मुंदडा पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून हा कायदा अस्तित्त्वात आहे. तरीही पोलीस या कायद्यान्वये गुन्हा दाखल न करता न लावता नुसता गुन्हा नोंदवून घेत आहेत. ज्या रुग्णाने आणि नातेवाईकाने मारहाण केली आहे, त्यांचा पत्ता पोलिसांना नाही. त्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेणे आवश्यक आहे. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Resident Doctor Unprotected